कर्नाटकी संगीताला वेगळी दिशा देणारे प्रख्यात गायक एम. बालमुरलीकृष्ण यांचे मंगळवारी निधन झाले. बालमुरलीकृष्ण यांनी चेन्नईतील कनकासरी नगर येथील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते.

मूळचे आंध्र प्रदेशमधील असणाऱ्या एम. बालमुरलीकृष्ण यांनी त्यांच्या जीवनातील बराच काळ चेन्नईमध्ये व्यतीत केला. एक सुप्रसिद्ध गायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या बालमुरलीकृष्ण यांनी संगीतकार आणि अभिनेता म्हणूनही भूमिका निभावल्या होत्या. तेलगू चित्रपट ‘भक्त प्रल्हाद’ यात त्यांनी नारदाची भूमिका साकारली होती. व्हॉयलिन, मृदंग आणि कंजिरा ही वाद्ये वाजविण्यातही ते निष्णात होते.

भारतीय संगीत कलेमध्ये दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल भारत सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या नागरी क्षेत्रातील दुसऱ्या महत्त्वाच्या अशा ‘पद्मविभूषण’ या पुरस्काराने त्यांना १९९१ साली गौरविण्यात आले होते. कर्नाटकी संगीत कलेची ख्याती जागतिक पातळीवर पोहोचवण्यामध्ये एम. बालमुरलीकृष्ण यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या जाण्याने कलाविश्वात आणि विशेषत: कर्नाटकी संगीत क्षेत्रामध्ये एक प्रकारची पोकळीच निर्माण झाली आहे.