दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयांवर मंगळवारी सकाळी केंद्रीय अन्वेषण विभागाने छापे टाकले. केजरीवाल यांनी स्वतःच ट्विटरच्या माध्यमातून याबद्दल माहिती दिली. मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांच्याविरुद्ध सीबीआयकडे दाखल असलेल्या प्रकरणी हे छापे टाकण्यात आले असून, केजरीवाल यांच्याशी त्याचा काही संबंध नाही, असेही सीबीआयने म्हटले आहे. आम आदमी पक्षाने सीबीआयचा दावा फेटाळला असून, मुख्यमंत्री कार्यालयातील गोपनीय फाईली तपासण्यासाठी हा छापा टाकण्यात आल्याचे आपने म्हटले आहे.
छाप्यांनंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालय सील केले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर अशा पद्धतीने छापे टाकून ते सील केल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे. अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. राजकारणात मोदी माझी वाटचाल रोखू शकत नसल्यामुळे त्यांनी अशा पद्धतीचे भ्याड कृत्य केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंग यांनी या छाप्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. सीबीआय हा केंद्र सरकारच्या हातातील पोपट आहे, हे न्यायालयानेही म्हटले आहे. देशात पहिल्यांदाच अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आली आहे. छापे टाकण्यापूर्वी केजरीवाल यांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. देशात आणीबाणी निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
दिल्लीतील राज्य सरकारचे सचिवालय असलेल्या ठिकाणी सीबीआयने छापे टाकले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल आहे. त्या पार्श्वभूमीवर हे छापे टाकण्यात आल्याचे सीबीआयने म्हटले आहे. दरम्यान, केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केंद्र सरकार सीबीआयच्या कामकाजात हस्तक्षेप करू शकत नसल्याचे म्हटले आहे.