नवीन बँक खाते उघडण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे. तसंच केंद्र सरकारच्या या नवीन निर्णयानुसार, ५० हजार रुपये अथवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या बँक व्यवहारांसाठीही आधार कार्ड क्रमांक सांगणं बंधनकारक असेल. सर्व बँक खातेधारकांना ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत आधार कार्ड क्रमांक बँकेत द्यावा लागणार आहे. असं न केल्यास त्यांची खाती अवैध ठरवण्यात येतील.

आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक असणारा कायम खाते क्रमांक (पॅन) आणि प्राप्तिकर विवरणपत्रांसाठी (आयटी रिटर्न्स) आधार क्रमांक सक्तीचा करण्याचा केंद्र सरकारचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने अंशत: वैध ठरविला होता. आधार क्रमांक असलेल्यांना तो ‘पॅन’ व विवरणपत्रांशी १ जुलैपर्यंत जोडणे क्रमप्राप्त झाले आहे; पण आजतागायत आधार न काढलेल्यांवर तशी कोणतीही सक्ती नसेल, असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिला होता. त्यानंतर गेल्याच आठवड्यात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (सीबीडीटी) काही महत्त्वपूर्ण निर्देश जारी करण्यात आले होते. त्यानुसार सध्या ज्यांच्याकडे आधार कार्ड असेल त्यांनी आयकर भरताना ते सादर करणे सक्तीचे असेल. तसेच १ जुलैपासून नव्या पॅनकार्डसाठीही आधार कार्डाची गरज असेल, असे ‘सीबीडीटी’तर्फे सांगण्यात आले होते. १ जुलै रोजी ज्यांना पॅनकार्ड आणि आधार क्रमांक मिळालेला असेल त्यांनी पॅनकार्ड व आधारकार्डाच्या जोडणीसाठी आयटी अधिकाऱ्यांकडे आपला आधार क्रमांक द्यावा. सध्या न्यायालयाच्या निर्णयामुळे ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही, त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. ज्यांना आधार कार्ड काढायचे नाही त्यांची पॅनकार्ड तुर्तास तरी रद्द होणार नाहीत, असेही ‘सीबीडीटी’कडून स्पष्ट करण्यात आले होते.