लडाखमधील घुसखोरी  
लडाखमधील आपल्या सैन्याच्या घुसखोरीसंबंधी चीनने आपला हेका कायमच ठेवला असून, आमच्या सैन्याने कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा भंग करून कधीही चिथावणीखोर वर्तन केलेले नाही, असा साळसूद पवित्रा घेतला आहे. दरम्यान, भारताचे लष्करप्रमुख जन. विक्रमसिंग यांनी गुरुवारी संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅण्टोनी यांची भेट घेऊन लडाख आणि तेथील विद्यमान परिस्थितीची त्यांना विस्तृत कल्पना दिली.
घुसखोरीच्या मुद्दय़ावरून भारत आणि चीन यांच्यात सध्या तणाव निर्माण झालेला असला तरी भारताचे परराष्ट्रमंत्री सल्मान खुर्शीद हे येत्या ९ मे रोजी चीनच्या दौऱ्यावर जात आहेत. चीनचे पंतप्रधान ली केक्विआंग हे त्यानंतर मे महिन्याच्या उत्तरार्धात भारतभेटीवर येत असून, त्याआधी खुर्शीद हे चीनला जात असल्यामुळे या दौऱ्यास महत्त्व आहे.
आमच्या सैनिकांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा भंग करून कोणत्याही प्रकारचे चिथावणीखोर वर्तन केलेले नाही, याचा पुनरुच्चार चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला. चीनच्या सैनिकांनी कधीही प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडलेली नाही. चीन आणि भारत हे शेजारी देश असून दोन्ही देशांमधील सीमेची अद्याप आखणी झालेली नाही आणि सीमेवरील प्रांतांमध्ये काही वेळा अशा प्रकारच्या कुरबुरी होतच असतात, असे त्यांनी सांगितले.
अशा समस्या उद्भवल्यानंतर मैत्रीपूर्ण वातावरणात चर्चा करूनच त्यांचे निराकरण करणे गरजेचे आहे. त्याच पद्धतीने हीही समस्या उभय बाजूंनी सोडविली जाईल आणि सीमेवरील प्रांतामधील शांतता आणि स्थैर्यास कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही याचा विश्वास वाटतो. भारत आणि चीन यांच्यातील संबंधांवरही परिणाम होणार नाही, असे हुआ चुनयिंग यांनी नमूद केले. याप्रकरणी प्रसारमाध्यमांनी संयम बाळगावा आणि या मुद्दय़ाचे निराकरण करण्यासाठी त्यांनीही अनुकूल वातावरणनिर्मिती करावी, असे आवाहन केले.
चीन-भारत सीमेवरील परिस्थिती शांत आणि स्थिर असल्याचे चुनयिंग यांनी सांगितले. शांततापूर्ण वाटाघाटी आणि चर्चेच्या माध्यमातूनच तंटा सोडविण्याची भारत आणि चीनची इच्छा असून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागाचे रक्षण करण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांमध्ये झालेले करार आणि प्रथांचे आमच्या सैन्याने कसून पालन केले असल्याचा चुनयिंग यांनी पुनरुच्चार केला. नियंत्रण रेषेच्या भागातील विशिष्ट तटबंदी भारताने उठवावी, असा आग्रह चीनच्या सैन्याने धरला असल्याबद्दल विचारले असता मी काही त्या आघाडीवर नाही. त्यामुळे आताच्या घडीला तेथे काय चालले आहे, याची आपल्याला कल्पना नाही, असे साळसूद उत्तर चुनयिंग यांनी दिले. मात्र हा प्रश्न शांततापूर्ण वाटाघाटींच्या माध्यमातूनच सोडवावा, अशी भारत आणि चीनची इच्छा आहे, असे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.
खुर्शीद चीनच्या दौऱ्यावर
भारताचे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद हे येत्या ९ मे रोजी चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आपण ठरल्याप्रमाणे चीनला जात असून चीनच्या सैन्याने भारतीय हद्दीत केलेल्या घुसखोरीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर भारत आणि चीन यशस्वी तोडगा काढतील, असा विश्वास खुर्शीद यांनी व्यक्त केला. असे वादग्रस्त मुद्दे उत्पन्न झाल्यानंतर त्यांचे निराकरण करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये एक यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातूनच याही मुद्दय़ाचे निराकरण करण्यावर खुर्शीद यांनी भर दिला.
दरम्यान, लष्करप्रमुख जनरल विक्रमसिंग यांनी संरक्षणमंत्री ए. के.अ‍ॅण्टोनी यांची गुरुवारी भेट घेऊन लडाखमधील परिस्थितीबद्दल त्यांना विस्तृत कल्पना दिली. या मुद्दय़ावर लष्कराने सरकारला विविध पर्याय सादर केले असून, विद्यमान परिस्थिती हाताळण्यासाठी लष्कराने चढाईखोर धोरण अवलंबिण्याच्या सल्ल्याचाही समावेश आहे.