मेगन मार्कल आणि तिचा पती हॅरी यांनी ऑपरा विन्फ्रेला दिलेल्या मुलाखतीमध्ये ब्रिटीश राजघराण्यावर वर्णद्वेषाचा आरोप केला आहे. आपल्या बाळाचा रंग काय असेल याची चिंता राजघारण्याला होती असा आरोप मेगननं केला आहे. या प्रकरणावरुन जगभरामध्ये चर्चा सुरु असतानाच फ्रान्सच्या ‘शार्ली हेब्दो’ या साप्ताहिकाने याच विषयावर छापलेल्या व्यंगचित्रावरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे चित्र म्हणजे आगीत तेल ओतण्याचा प्रकार असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.

‘शार्ली हेब्दो’ने काढलेल्या या कव्हर पेजवरील चित्रामध्ये ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ (द्वितीय) या मेगनच्या मानेवर गुडघा ठेऊन उभ्या असल्याचं दाखवण्यात आलं आहे. अमेरिकेमध्ये मागील वर्षी जून महिन्यामध्ये मिनिसोटा राज्यातील चार पोलिसांनी जॉर्ज फ्लॉईड या निशस्त्र तरुणाच्या मानेवर भर रस्त्यात ९ मिनिटे पाय दाबून ठेवून त्याची हत्या केली. याच प्रकरणावरुन नंतर अमेरिकेमध्ये मोठे आंदोलनही झालं होतं. त्यानंतर वर्णद्वेषाला विरोध करण्यासाठी गुडघ्यावर बसून आपला पाठिंबा देताना अनेक सेलिब्रिटी आणि खेळाडू दिसले होते. याच घटनेचा संदर्भ वापरुन ‘शार्ली हेब्दो’ने हे चित्र रेखाटलं आहे. यामध्ये मेगन ही जॉर्जच्या जागी अन्याय सहन करणारी व्यक्ती म्हणून दाखवण्यात आलीय.

मेगनने बर्किंगहॅम का सोडलं? या मथळ्याखाली हे व्यंगचित्र छापण्यात आलं आहे. राणीने मानेवर पाय दिलेल्या अवस्थेत मेगन, “कारण मला तिथे गुदमरल्यासारखं होत होतं,” असं उत्तर देताना व्यंगचित्रात दिसत आहे.

(फोटो सौजन्य: Twitter/hour_womans वरुन साभार)

या व्यंगचित्रावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वर्णद्वेषाविरोधात लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या हलिमा बेगम यांनी ट्विटरवरुन या चित्राबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. “जॉर्जची हत्या करणाऱ्याच्या जागी राणी दाखवून ती मेगनला चिरडत असल्याचे दाखवलं आहे? मेगन गुदरमल्यासारखं होत असल्याचं सांगतेय? या चित्राने काहीच साध्य होतं नसून यामधून कोणालाही हसुही येत नाहीय किंवा तुम्ही वर्णद्वेषाविरोधात आवाजही उठवत नाहीयत. यामुळे प्रकरणाला वेगळं वळण मिळत आहे आणि नाराजी ओढवून घेतली जात आहे,” असं हलिमा यांनी म्हटलं आहे.

यावरील इतर काही प्रतिक्रिया पाहुयात

तुम्हाला वर्णद्वेषासंदर्भात जाणून घ्यायचं असेल तर हे बघा

आता हे पाहणं महत्वाचं ठरेल की…

नेहमी वादग्रस्त व्यंगचित्र छापतात

राणीने दिलेलं उत्तर…

दरम्यान, या मुलाखतीमध्ये मेगन आणि हॅरीने केलेले सर्व आरोप राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी उत्तर दिलं आहे. एलिझाबेथ यांनी प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांच्याबाबत चिंता आणि सहानुभूती व्यक्त केली आहे. “गेली काही वर्ष हॅरी आणि मेगन यांच्यासाठी कितपत आव्हानात्मक होती हे समोर आल्यानंतर कुटुंबाला त्यांच्यासंबंधी चिंता सतावत आहे. जे मुद्दे उपस्थित करण्यात आले आणि त्यातही खासकरुन रंगाचा तो खूप चिंता निर्माण करणारा आहे. काही गोष्टींमध्ये मतांतर असू शकतं पण हे सर्व गांभीर्याने घेण्यात आलं असून कुटुंब खासगीत यासंबंधी चर्चा करेल,” असं त्यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी हॅरी, मेगन आणि आर्ची हे नेहमीच कुटुंबातील प्रिय सदस्य असतील असंही स्पष्ट केलं होतं.