पाटणा येथील प्राणिसंग्रहालयात चिम्पांझींना थंडीपासून बचाव करता यावा, यासाठी वनौषधींवर आधारित शक्तिवर्धक देण्यात आले आहे. भुवनेश्वर येथील नंदनकानन प्राणिसंग्रहालयातून चिम्पांझींची एक जोडी येथील संजय गांधी बोटॅनिकल गार्डनमध्ये आणण्यात आली असून त्यांना रोज सकाळी व संध्याकाळी च्यवनप्राश हे आयुर्वेदिक शक्तिवर्धक दिले जात आहे. थंडीपासून त्यांचा बचाव करण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याचे पाटणा प्राणिसंग्रहालयाचे संचालक अभयकुमार यांनी सांगितले.  ते म्हणाले, की चिम्पांझी माकडांमध्ये माणसांसारखेच गुणधर्म असतात. त्यांना आयुर्वेदिक शक्तिवर्धक दिल्यास थंडीच्या दिवसांत चांगला परिणाम दिसून येतो. प्राणिसंग्रहालयाचे डॉक्टर समरेंद्र बहादूर सिंग यांनी सांगितले, की चिम्पांझींना दररोज सकाळ-संध्याकाळ पंधरा ग्रॅम च्यवनप्राश दिले जाते. च्यवनप्राशमध्ये क जीवनसत्त्व असते. त्याचा चांगला परिणाम होतो. हिवाळय़ात त्यांच्या आहाराचेही खास नियोजन करावे लागते. थंडीच्या प्रमाणानुसार त्यांचा आहार अधिक पौष्टिक केला जातो, तसेच वाढवलाही जातो. मार्जारवर्गातील प्राण्यांना रोज ८-९ किलो चिकन दिले जाते ते ११ किलो करण्यात आले आहे. अस्वलांना थंडीत मध दिले जात आहे.