छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातील पोलिसांनी एका बकरीला ताब्यात घेऊन ७ वर्षांची शिक्षेची तरतूद असलेला गुन्हा तिच्यावर दाखल केला. त्याच झाल असं की, एक बकरी जिल्हा न्यायाधीशांच्या बागेत घुसून चरायची हा बकरीचा गुन्हा. सोमवारी अटक करण्यात आलेल्या बकरी आणि तिच्या मालकाची मंगळवारी जामीनावर मुक्तता करण्यात आली. दोघांवर लावण्यात आलेल्या कलमात दोन ते सात वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे.
कोरियाचे जिल्हा न्यायाधीश हेमंत रात्रे यांच्या माळ्याने बकरी आणि तिचा मालक अब्दुल हसनच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली होती. बकरीला बागेत चरण्याची सवय जडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हेमंत रात्रे यांच्या बंगल्याला असलेले पंचवीस फूट उंच लोखंडी प्रवेशद्वार पार करून बकरी बंगल्यात घुसत असे. बंगल्यामधील माळ्याकडून बकरीच्या मालकाला याबाबत अनेकवेळा समज देण्यात आली होती. शेवटी त्याने पोलिसांत तक्रार दाखल केल्याने आम्ही बकरी आणि तिच्या मालकाला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. बकरी बंगल्यात घुसून बागेत लावण्यात आलेला भाजीपाला खात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याबाबत हेमंत रात्रे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने पोलिसांनी सदर कारवाई केली.