छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला लक्ष्य केले असून या नक्षलवादी हल्ल्यात सुरक्षा दलातील एक जवान शहीद झाला आहे. तर या हल्ल्यात तीन नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

गुुरुवारी सकाळी दंतेवाड्यातील बचेली येथे नक्षलवाद्यांनी सीआयएसएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला लक्ष्य केले. नक्षलवाद्यांनी बसच्या मार्गावर घडवलेल्या स्फोटात एका जवान शहीद झाला. तर तीन नागरिकांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. घटनेत जखमींची परिस्थिती पाहता मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

गेल्या १० दिवसांत दंतेवाड्यात सुरक्षा दलांवर हा दुसरा नक्षली हल्ला आहे. यापूर्वीही ३० ऑक्टोबर रोजी दंतेवाड्यात नक्षलींनी सुरक्षा दलांवर केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) दोन जवान शहीद झाले होते. तर दूरदर्शनच्या एका कॅमेरामनचाही मृत्यू झाला होता. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचाही खात्मा करण्यात आला होता.