पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आसाममध्ये ‘एनआरसी’ विरोधात उत्तर कोलकातामध्ये आज (गुरूवार) एक विशाल मोर्चा काढला होता. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एनआरसीच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. जर भाजपाने एनआरसीच्या नावाखाली बंगालमध्ये एकाही व्यक्तीला धक्का जरी लावला तर आम्ही त्यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही, असे त्यांनी यावेळी म्हटले.

तसेच मुख्यमंत्री ममता यावेळी म्हणाल्या की, धर्मासाठी, हिंदू, मुस्लीम, शीख आणि ईसाई यांच्यासाठी मी एनआरसीशी सहमत नाही. तुम्ही तुमच्या पोलिसांच्या बळाचा वापर करून आसामप्रमाणे बंगालचे तोंड बंद करू शकत नाही. अचानक तुम्ही आम्हाला धर्म शिकावयला लागला आहात, जसे की आम्ही ईद, दुर्गा पुजा, मोहर्रम आणि छठ पुजा मानतच नाही.

एनआरसीच्या मुद्यावरून भाजपा लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम करत असल्याचाही आरोप यावेळी तृणमुल काँग्रेसकडून करण्यात आला. या अगोदरही टीएमसीकडून एनाआरसी विरोधात राज्यात सात आणि आठ सप्टेंबर रोजी मोर्चे काढण्यात आले होते.

या अगोदरही मुख्यमंत्री ममता यांनी मोठ्या संख्येत बंगालमधील नागरिकांना एनआरसीच्या अंतिम यादीतून वगळण्यात आल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. तेव्हा मुख्यमंत्री ममता यांनी ट्विटरवर म्हटले होते की, एनआरसीच्या अपयशाने त्या सर्व लोकांना उघडे पाडले आहे जे याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना देशाला अनेक उत्तर द्यायची आहेत. तसेच त्यांनी हे देखील म्हटले होते की, असे तेव्हा होते जेव्हा एखादे कार्य समाजाच्या व देशाच्या हिता ऐवजी चुकीच्या उद्देशाने केले जाते.