बीजिंग : करोनाग्रस्त वुहानमध्ये कंपन्यांना काम सुरू करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे चीनने बुधवारी जाहीर केले. वुहान शहराने आता करोनाची लढाई जिंकल्यात जमा असून अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी तेथे नुकतीच भेट दिली. वुहान ही हुबेई प्रांताची राजधानी असून ते करोनाच्या संसर्गाचे केंद्रस्थान होते.

जानेवारीपासून तेथील उद्योग राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आल्यानंतर बंद करण्यात आले होते. वुहानमध्ये आता गेल्या काही आठवडय़ांत दैनंदिन मृत व संसर्गित व्यक्तींची संख्या कमी होत असून तेथे विषाणूचा प्रसार आता थांबण्याच्या दिशेने वाटचाल आहे, असे जिनपिंग यांनी वुहान भेटीत सांगितले होते. वुहानमध्ये जे उद्योग हे रोजच्या दैनंदिन गरजांशी संबंधित आहेत ते सुरू करता येतील, असे हुबेई प्रांताच्या सरकारने म्हटले आहे.

वुहानमधील जागतिक औद्योगिक साखळ्याही परवानगी घेऊन उत्पादन सुरू करू शकणार आहेत. उर्वरित कंपन्या वीस मार्चनंतर उत्पादन  सुरू करू शकतील. मध्यम व कमी जोखमीच्या भागात जास्त कंपन्यांना काम सुरू करण्याची परवानगी दिली जाणार आहे. बस, रेल्वे, जहाजे, विमाने या सर्व सेवा कमी व मध्यम जोखमीच्या क्षेत्रात सुरू केल्या जाणार आहेत. या राज्यातील लोकांना अजूनही बाहेर जाऊ दिले जाणार नाही त्यांना आरोग्याबाबत ‘ग्रीन लेबल’ देण्यात आले असेल तरच ते प्रदेशांतर्गत हालचाली करू शकतील.

मोबाइल अ‍ॅपच्या मदतीने व्यक्तींना ‘ग्रीन लेबल’ दिले जाणार असून त्याचा अर्थ त्या व्यक्तीचा कुठल्याही विषाणूग्रस्ताशी संपर्क आलेला नाही. ‘यलो लेबल ’असेल तर त्यांचा संपर्क आलेला असेल. निश्चित किंवा संशयितांना ‘रेड लेबल’ दिले जाणार असून त्यांना वेगळेच ठेवले जाणार आहे. वुहानमध्ये कर्मचाऱ्यांना परत कामावर पाठवण्यासाठी वेगळी पद्धत लागू करण्यात आली असून जे हुबेईत अडकून पडले आहेत त्यांना मदत केली जाणार आहे. हुबेईत शाळा मात्र बंदच राहणार आहेत. हुबेई  प्रांत २३ जानेवारीपासून बंद आहे.