मागच्या महिन्यात पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षात आपले नेमके किती सैनिक ठार झाले ते चीनने अजूनही जाहीर केलेले नाही. चीन आपल्या सैनिकांचे बलिदान मान्य करायला तयार नाहीय. उलट चिनी सरकार गलवानमध्ये मृत्यू झालेल्या सैनिकांच्या कुटुंबावर त्यांचा दफनविधी आणि अंत्यसंस्काराशी संबंधित कुठलेही शोक कार्यक्रम आयोजित करू नये, यासाठी दबाव टाकत आहे. अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी ही माहिती दिली आहे. एएनआयने हे वृत्त दिले आहे.

१५ जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. दोन्ही बाजूला जिवीतहानी झाली. भारताचे २० जवान शहीद झाले. भारताने आपले जवान शहीद झाल्याचे मान्य करुन त्यांची नावे जाहीर केली. पण दुसऱ्या बाजूला चीनने आपले नेमके किती सैनिक मारले गेले. ते जाहीर केले नाही. आपल्याला दोन्ही देशांमध्ये तणाव आणखी वाढवायचा नाही असे चीनकडून सांगण्यात आले. या संघर्षात चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले आहेत.

गलवान संघर्षात आपल्या प्रियजनांना गमावाल्यामुळे दु:खात असलेल्या चिनी कुटुंबांना तेथील सरकारकडून अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. पहिल्यांदा चिनी सरकारने आपल्या बाजूला जिवीतहानी झाल्याचे मान्य करायला नकार दिला. त्यानंतर आता सैनिकांच्या दफनविधीला परवानगी नाकारली जात आहे.

“पांरपारिक पद्धतीने दफनविधी करु नका, त्याऐवजी शांततेत, निर्जन ठिकाणी दफनविधी करा” असे चीनच्या नागरिक मंत्रालयाकडून ठार झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना सांगण्यात आले आहे. अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने ही माहिती दिली आहे. चीनने त्या रात्री एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केल्यामुळे संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती.