चीनमधील कुनमिंग व कोलकाता ही शहरे बुलेट ट्रेनने जोडण्याचा आमचा विचार आहे अशी माहिती कोलकातामध्ये चीनचे महावाणिज्य दूत मा झान्वू यांनी दिली. बुधवारी कोलकात्यामध्ये एका कार्यक्रमात बोलताना मा झान्वू यांनी ही माहिती दिली.

दोन्ही देशांच्या संयुक्त प्रयत्नांनी कोलकाता आणि कुनमिंग शहरांदरम्यान हायस्पीड रेल्वे मार्ग सुरू होऊ शकतो, असं झान्वू म्हणाले. जर हा रेल्वे मार्ग प्रत्यक्षात उतरला तर कुनमिंग व कोलकाता शहरांमधील अंतर अवघ्या काही तासांवर येईल असंही ते पुढे म्हणाले. या रेल्वेमार्गाचा म्यानमार आणि बांगलादेशलाही फायदा होईल, कारण हा मार्ग म्यानमार व बांगलादेशमधून जाईल या २८०० कि.मी.च्या मार्गावर औद्योगिक प्रकल्पांचे जाळेही विणले जाऊ शकते. त्याचा प्रकल्पात सहभागी सर्वच देशांना फायदा होईल. यापूर्वी 2015 मध्ये ग्रेटर मेकांग सब्रेगियन (जीएमएस) च्या कुनमिंगमध्ये झालेल्या बैठकीतही या प्रस्तावाचा उल्लेख करण्यात आला होता, असंही झान्वू म्हणाले.