चीनच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावली असली तरी त्यांनी अर्थसंकल्पात संरक्षणावरील तरतुदीत १० टक्के  वाढ केली आहे, त्यामुळे लागोपाठ पाचव्या वर्षी चीनने संरक्षण खर्चासाठीच्या तरतुदीत वाढ केली आहे.
प्रादेशिक व सागरी कलहांमुळे जगातील सर्वात जास्त सैन्य असलेल्या चीनने अमेरिकेच्या तोडीस तोड असे लष्कराचे आधुनिकीकरण करण्यासाठी संरक्षण खर्चात वाढ केली आहे. चीनने संरक्षण खर्चासाठी १४५ अब्ज डॉलर्सची तरतूद केली आहे तर भारताची तरतूद केवळ ४० अब्ज डॉलर्स आहे.
चीन या वर्षी संरक्षण खर्च दहा टक्के वाढवणार आहे. गेल्या वर्षी  तो १२.२ टक्के वाढवला होता. नॅशनल पीपल्स काँग्रेसचे प्रवक्त्या फू यिंग यांनी सांगितले, की वार्षिक अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. संरक्षण प्रवक्त्या यिंग यांनी सांगितले, की खरा आकडा अर्थसंकल्पातच कळेल. उद्या अर्थसंकल्पीय अहवाल प्रकाशित केला जाणार आहे. चीनचा संरक्षण खर्च गेल्या वर्षी १२.२ टक्क्यांनी वाढवून १३२ अब्ज डॉलर करण्यात आला होता. चीनचा आर्थिक वाढीचा दर पाच वर्षांतील नीचांकी म्हणजे दहा टक्के आहे. लागोपाठ पाचव्या वर्षी त्या देशाने संरक्षण खर्चात मोठी वाढ केली आहे. गेल्या तीन वर्षांत संरक्षण खर्चात दहापट वाढ करण्यात आली असून, चीनसारख्या मोठय़ा देशाला संरक्षणासाठी लष्कराच्या आधुनिकीकरणाची गरज आहे. लष्करी खर्चात मागे पडल्यास हल्ले होऊ शकतात हे चीनला इतिहासाने शिकवले आहे. चीनचे सुरक्षा धोरण हे बचावात्मक आहे. चीनच्या लष्कराचे आधुनिकीकरण आम्हाला स्वबळावर करावे लागणार आहे.