बांगलादेशमध्ये स्थानिक कामगारांचा मुद्दा पेटला असून हजारो कामगार आपापसांत भिडले आहेत. ढाका येथे १३२० मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारला जात असून त्याचठिकाणी कामगारांमध्ये संघर्ष पेटला. यामध्ये चीनमधील एका कामगाराचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशी कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर हिंसाचाराला सुरुवात झाली. चीन या प्रकल्पासाठी फंडिंग पुरवत असून मृत्यूची बातमी जाणुनबुजून दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आहे.

एका क्षणी जवळपास हजारो बांगलादेशी आणि चिनी कामगार आपापसांत भिडले होते. यावेळी अनेकजण जखमी झाले आहेत. सहा चिनी कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ‘रुग्णालयात उपचार सुरु असताना एका चिनी कामगाराचा मृत्यू झाला आहे’, अशी माहिती स्थानिक पोलीस प्रमुख मोनीरुल इस्लाम यांनी दिली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एक हजार पोलीस घटनास्थळी उपस्थित होते असंही त्यांनी सांगितलं.

चीन आणि बांगलादेशमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. चीनमधील सरकारी आणि खासगी कंपन्या वीज, वाहतूक तसंच पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी बांगलादेशमध्ये गुंतवणूक करत आहेत. यामुळे बांगलादेशमध्ये चिनी कामगारांची संख्या जास्त आहे. यामुळे स्थानिकांमध्ये रोष आहे. एक वर्षांपुर्वीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण सहा हजार लोक वीज प्रकल्प साईटवर काम करत असून यामधील दोन हजार चीनमधील आहेत. दरम्यान याप्रकरणी स्थानिक प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.