भाजपा जय श्री राम या घोषणेचा वापर आपल्या पक्षाच्या घोषणेप्रमाणे करत आहे. या माध्यमातून धर्म आणि राजकारण एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या राजकीय घोषणा लादण्याचा सुरू असलेला प्रयत्न कधीही खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिला आहे. दरम्यान, कोणत्याही पक्षाने त्याच्या राजकीय फायद्यासाठी तयार केलेल्या घोषणेशी आपल्याला कोणताही संबंध नाही. प्रत्येक पक्षाचे आपले घोषवाक्य असते. त्याचा आम्ही सन्मान करतो, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

जय सिया राम, जय राम जी की, राम नाम सत्य अशा घोषणांचा काही धार्मिक आणि सामाजिक अर्थ आहे. त्याचा आम्ही आदर करतो, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. यासंदर्भात त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही कथितरित्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे जबरदस्तीने लादण्यात येणाऱ्या कोणत्याही घोषणांचा सन्मान करत नाही. याद्वारे द्वेषाची भावना पसरवण्याचे काम सुरू असून याचा आपण विरोध केला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. भाजपाने आपल्या विकृत विचारधारेच्या माध्यमातून नकारात्मक पद्धतीने पश्चिम बंगालला लक्ष्य केले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, आता राजकीय कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी कारवाई करण्याची वेळ आली आहे. जेणेकरून धर्माच्या मदतीने मतभेद पसरवणाच्या विचारधारेला घेऊन कोणी हिंसा आणि सामान्य जीवनशैली नष्ट करण्यात सामिल होणार नाही, असे त्यांनी नमूद केले आहे. तसेच देशातील जनतेने अशा राजकारणाला योग्य ते उत्तर द्यावे आणि आपल्या संस्कृतीचा सन्मान करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.