होशंगाबादमधील कॉंग्रेसचे खासदार राव उदयप्रताप सिंग यांनी गुरुवारी पक्षाला रामराम ठोकत आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना राव उदयप्रताप सिंग यांच्या प्रवेशामुळे भाजपला बळ मिळाले आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या समवेत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सिंग यांच्या पक्षप्रवेशाबद्दल माहिती देण्यात आली. चौहान म्हणाले, राव उदयप्रताप सिंग हे केवळ एक चांगले राजकारणी नसून, उत्तम सामाजिक कार्यकर्तेही आहेत. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे आपल्याला प्रोत्साहन मिळते. राज्याच्या विकासासाठी आम्ही दोघे मिळून काम करू, असेही त्यांनी सांगितले.
कॉंग्रेसमध्ये आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याने भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे राव उदयप्रताप सिंग यांनी सांगितले.