काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांच्या एका वक्तव्यामुळे काँग्रेस पक्षाच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून, भाजपाला काँग्रेसला घेरण्याची आयती संधी मिळाली आहे. काँग्रेसच्या हाताला मुस्लिमांच रक्त लागलं आहे आणि लोकांनी आपल्या चुकांमधून शिकलं पाहिजे असं वक्तव्य सलमान खुर्शीद यांनी केलं आहे. अलीगड मुस्लिम विद्यापीठात एका माजी विद्यार्थ्याने काँग्रेसच्या कार्यकाळात घडलेल्या बाबरी मशीद आणि इतर जातीय दंगलींबद्दल प्रश्न विचारला असता सलमान खुर्शीद यांनी काँग्रेसच्या हाताला मुस्लिमांचं रक्त लागलं असल्याचं मान्य केलं. सलमान खुर्शीद यांच्या वक्तव्यानंतर भाजपाने काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात जवळपास पाच हजार दंगली घडल्याचा आरोप केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केला आहे.

एएमयूमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सलमान खुर्शीद यांना एका विद्यार्थ्याने काँग्रेसच्या कार्यकाळात मुस्लिमांवर अन्याय झाला असल्याचा मुद्दा उपस्थित केला. आमीर या विद्यार्थ्याने १९८४ शीखविरोधी दंगल आणि १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीचा प्रामुख्याने उल्लेख केला होता. यावर बोलताना सलमान खुर्शीद यांनी, ‘मी काँग्रेसचा भाग आहे आणि आमच्या हाताला मुस्लिमांचं रक्त लागलं आहे हे मान्य केलं पाहिजे. आम्ही आमच्या हाताला लागलेलं रक्त तुम्हाला दाखवण्यास तयार आहोत, जेणेकरुन ते आपल्या हाताला लागू नये हे तुम्हाला कळावं’, असं म्हटलं.

यावेळी सलमान खुर्शीद यांनी आपल्याला हा प्रश्न का विचारला जात आहे याची कल्पना असल्याचंही सांगितलं. ‘आमच्या हातावर डाग असल्याने तुम्ही आम्हाला हा प्रश्न विचारताय. तुम्ही सांगताय की, आमच्यावर हल्ला झाला तर काँग्रेसने पुढे होऊन तो थांबवू नये. मी तुम्हाला सांगतोय, आम्ही आमच्या हाताला लागलेलं रक्त तुम्हाला दाखवण्यास तयार आहोत जेणेकरुन ते तुमच्या हाताला लागू नये. जर तुम्ही त्यांच्यावर हल्ला केला असता, तर रक्ताचे हे डाग तुमच्या हातावर असते. इतिहासातून शिका आणि पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. जेणेकरुन पुन्हा १० वर्षांनी जेव्हा तुम्ही विद्यापीठात परत याल तेव्हा हा प्रश्न तुम्हाला कोणी विचारणार नाही’, असं सलमान खुर्शीद यावेळी बोलले.

सलमान खुर्शीद सध्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. काँग्रेसने सरन्यायाधीशांविरोधात महाभियोग प्रस्ताव सादर केल्याने त्यामनी नाराजी व्यक्त केली होती. महाभियोग ही अत्यंत गंभीर बाब असून एखाद्या निर्णयावर नाराज असल्याने त्याचा वापर करणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान सलमान खुर्शीद यांच्या वक्तव्यावर भाजपाने हल्ला चढवला आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात पाच हजार दंगली झाल्या आहेत. आणि आता जर ते त्यासाठी माफी मागत असतील तर उशिरा का होईना त्यांना शहाणपण सुचलं आहे. काँग्रेसने दंगलीच्या मागे लपून राजकारण केलं आहे. या घाणेरड्या राजकारणासाठी देश त्यांना माफ करणार नाही अशी टीका मुख्तार अब्बास नकवी यांनी केली आहे.