उत्तराखंडतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पक्षाच्या सर्व खासदार आणि आमदारांनी आपले एक महिन्याचे वेतन द्यावे, असा आदेश काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिला आहे.
इतकेच नव्हे तर लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांना खासदार निधीतून प्रत्येकी १० लाख रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचे आदेशही सोनिया गांधी यांनी दिले आहेत. लोकसभेत काँग्रेसचे २०३ तर राज्यसभेत ७२ सदस्य आहेत.
मदतकार्याला वेग यावा यासाठी पक्षाच्या वतीने डेहराडून येथे नियंत्रण कक्ष उघडण्यात आला आहे. मदतकार्यावर देखरेख ठेवण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेसचे चिटणीस संजय कपूर आणि पक्षाच्या सेवा दलाचे प्रमुख महेंद्र जोशी यांना डेहराडूनला पाठविण्यात आले आहे.
सर्व राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना आपापल्या राज्यांमधून उत्तराखंडमध्ये मदत पाठविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या शतकातील ही अत्यंत मोठी शोकांतिका असल्याचे उत्तराखंडचे कृषिमंत्री हरकसिंग रावत यांनी म्हटले आहे. केदारनाथमध्ये हानीचे प्रमाण सर्वाधिक असून संपूर्ण पायाभूत सुविधाच कोलमडल्या आहेत. या प्रकारातून सावरण्यासाठी किमान पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे.