काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना सकाळी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारानंतर बरं वाटत असल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून पुन्हा ईडीच्या कार्यालयाकडे नेण्यात आले. चिदंबरम सध्या आयएनएक्स मीडिया प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत आहेत.


चिदंबरम यांना सहा दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. मात्र, कोर्टाच्या या निर्णयाविरोधात सीबीआयने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. सीबीआयने म्हटले की, चिदंबरम यांच्याविरोधात दोन साक्षीदारांनी आपला जबाब न्यायाधीशांसमोर नोंदवला आहे. त्यामुळे चिदंबरम यांचा जामीन रद्द व्हायला हवा. कारण, ते जामीनावर बाहेर आल्यास साक्षीदारांवर दबाव आणू शकतात.

सुप्रीम कोर्टाने चिदंबरम यांना जामीन देताना म्हटले होते की, चिदंबरम यांना जामीन देण्यात आला असला तरी ते कनिष्ठ न्यायालयाच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ शकत नाहीत. त्यांना चौकशीत सहकार्य करावे लागेल. जेव्हा तपास यंत्रणा त्यांना चौकशीसाठी बोलावतील त्यांना जावे लागेल. आमच्या या निर्णयाचा परिणाम चिदंबरम यांच्याविरोधात सुरु असलेल्या दुसऱ्या प्रकरणांवर पडणार नाही, असेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले होते.