नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात ‘चलन’कल्लोळ निर्माण झाला आहे. मंगळवारी १३ दिवसांनंतरही देशातील आर्थिक व्यवहार सुरळित सुरू होऊ शकलेले नाहीत. बँका, एटीएमसमोर जुन्या नोटा बदलण्यासाठी व नव्या नोटा घेण्यासाठीच्या रांगांमध्ये अजूनही घट झालेली दिसत नाही. याचे पडसाद रस्त्यावर आणि संसदेतेही उमटत असून पंतप्रधान जोपर्यंत याप्रकरणी स्पष्टीकरण देत नाहीत तोपर्यंत संसदेचे कामकाज चालू देणार नसल्याचा पवित्रा विरोधी पक्षांनी घेतला आहे. गावपातळीवरही विविध पक्ष, संघटना या निर्णयाचा विरोध करताना दिसत आहे. हैदराबादमध्ये मंगळवारी काँग्रेसच्या एका नेत्याने अभिनव पद्धतीने नोटाबंदीमुळे होणाऱ्या त्रासाचा निषेध केला. माजी आमदार सुधीर रेड्डींनी हैदराबादेतील कोठापेठ येथील आंध्रा बँकेच्या नोटांअभावी बंद असलेल्या एटीएमची पूजा करून सरकारचा निषेध नोंदवला. तत्पूर्वी रेड्डी यांच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी केली.

रेड्डींनी ‘आऊट ऑफ कॅश’ असा फलक असलेल्या एटीएमसमारे नारळ फोडून एटीएमला हार घातला व त्याची आरती केली. तसेच हे एटीएम लवकर चालू होवो, अशी प्रार्थनाही केली. सरकारने कोणतीही पूर्वतयारी न करता घाईघाईने ५०० व १००० रूपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची टीका त्यांनी या वेळी केली. नोटाबंदीमुळे सामान्य लोकांना त्रास होत आहे. २००० रूपयांच्या नोटा असूनही त्याचा काहीच फायदा नसल्याचे त्यांनी म्हटले. २००० रूपयांची नोट रद्द करून सरकारने ५०० च्या नोटा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली.