राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर बिहारमध्ये पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या युतीच्या चर्चेने जोर धरला आहे. काँग्रेसचे बिहार प्रदेशाध्यक्ष अशोक चौधरी यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली.
चौधरी यांनी गुरुवारी अर्धा तास राहुल यांच्याशी चर्चा केली, तर बुधवारी त्यांनी सोनियांची भेट घेतली होती. बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजप यांच्यातील आघाडी संपुष्टात आल्यावर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीची त्यांनी कल्पना पक्षश्रेष्ठींना दिली. या दोन्ही पक्षांची पुन्हा आघाडी होण्याची स्पष्ट संकेत लालूप्रसाद यादव जामीनावर सुटल्यावर दिसत होते. रांची येथील कारागृहातून सुटका झाल्यावर सोनियांनी शुभेच्छा दिल्याचे लालूप्रसाद यांनी सांगितले होते. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारमध्ये पहिल्यांदा लालूप्रसाद रेल्वेमंत्री होते. काँग्रेसचे विश्वासू साथीदार म्हणून त्यांची ओळख होती.