काँग्रेसचा आरोप, ‘कॅग’ अहवाल आज संसदेत?

महालेखापाल (कॅग) राजीव महर्षी हे राफेल व्यवहाराबाबतचा अहवाल आज, सोमवारी संसदेत सादर करण्याची शक्यता असून त्यात ते सरकारला निर्दोषत्वाचे प्रमाण देऊन मदत करीत असल्याचा आरोप काँग्रेसने रविवारी केला. फ्रान्सकडून लढाऊ राफेल विमाने खरेदी व्यवहाराचे लेखापरिक्षण करण्यापासून महर्षी यांनी स्वत:ला दूर ठेवावे, असा सल्लाही काँग्रेसने पत्रकार परिषदेत दिला.

५८ हजार कोटी रुपये खर्चून ३६ राफेल विमाने खरेदी करण्याची ‘एकतर्फी घोषणा’ एप्रिल २०१५मध्ये करण्यात आली आणि १२६ विमानांच्या खरेदीचा व्यवहार जून २०१५मध्ये रद्द करण्यात आला, त्या वेळी महर्षी  वित्त सचिव होते, असे काँग्रेसचे नेते कपिल सिबल यांनी निदर्शनास आणले. दोन्ही व्यवहारांच्या वेळी वित्त सचिव या नात्याने महर्षी यांचा थेट संबंध होता. इतकेच नव्हे, तर ३६ राफेल विमानांच्या खरेदीच्या वाटाघाटी मे २०१५मध्ये सुरू झाल्या. वित्त मंत्रालयाचे प्रतिनिधी म्हणून कॉस्ट अकाऊंट सव्‍‌र्हिसचे सदस्य आणि आर्थिक सल्लागार हे वाटाघाटी करणाऱ्या भारतीय पथकाचा भाग होते. त्यामुळे राफेल व्यवहाराच्या वाटाघाटींशी तुमचाही सहभाग होता. राफेल व्यवहारातील अनियमितता, गोंधळ आणि भ्रष्टाचार तुमच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागाने आणि मंजुरीने वरिष्ठ पातळीवर सुरू होता. यातून या संपूर्ण प्रकरणाशी तुमचा थेट संबंध असल्याचे दिसते. ही परिस्थिती लक्षात घेता तुम्ही ३६ राफेल विमान खरेदी व्यवहाराचे अंकेक्षण करणे अयोग्य आहे, असे  काँग्रेसने कॅगला निवेदनाद्वारे कळवल्याचे सिब्बल यांनी सांगितले.