जनतेकडून आलेल्या सूचनांच्या आधारे लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा काँग्रेस तयार करणार आहे. त्यासाठी विशेष संकेत स्थळही निर्माण करण्यात आले असून महत्त्वाचे ठरू शकणारे मुद्दे लोकांना या संकेत स्थळावर सविस्तर मांडता येतील. पक्षाच्या जाहीरनामा समितीकडून आलेल्या प्रत्येक सूचनेची छाननी केली जाणार असून त्याआधारावर काँग्रेस जाहीरनामा प्रसिद्ध करेल, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जाहीरनामा समितीचे प्रमुख पी. चिदंबरम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

देशात सुमारे ४० कोटी लोक इंटरनेटचा वापर करत असल्याने जाहीरनामा बनवण्याच्या ‘जनआवाज’ प्रक्रियेत लोकांना ऑनलाइन सहभागी करून घेण्याचे काँग्रेसने ठरवले आहे. menifesto@inc.in या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी वा हिंदीतच सूचना पाठवण्याचे बंधन नाही. १६ भाषांमध्ये लोकांना सूचना लिहून पाठवता येतील. याशिवाय, ७७९२०८८२४५ हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकही लोकांसाठी उपलब्ध करून दिलेला असून त्यावरही सूचना पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पक्षाशी संबंधित नसलेली व्यक्तीही या संकेत स्थळावर तिच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे मांडू शकतो. विविध सामाजिक संघटना, व्यापारी-आर्थिक संघटना, विद्यार्थी संघटना, महिला गट अशा समाजातील विविध स्तरांतून सूचना अपेक्षित असल्याचे चिदंबरम यांनी सांगितले.

लोकसहभागासाठी खुली चर्चा

काँग्रेसच्या २२ सदस्यांच्या या जाहीरनामा समितीचे विषयानुसार २० उपगट करण्यात आले आहेत. प्रत्येक सदस्याकडे एका विषयाची जबाबदारी देण्यात आली असून देशाच्या विविध भागांत जाऊन हा सदस्य लोकांची चर्चा-विनिमय करेल. खुल्या चर्चेत सर्वसामान्य लोकांना सहभागी होता येईल. शिवाय, पक्ष नेते-कार्यकर्त्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली जाणार आहे. आत्तापर्यंत दक्षिण भारतातील राज्यांमध्ये तसेच, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये चर्चेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी मुंबईतही चिदंबरम यांच्या उपस्थितीत खुली चर्चा आयोजित केली होती. अशा चर्चामधून लोकांसाठी महत्त्वाचे विषय मांडले जात असल्याचे चिदंबरम यांनी सांगितले.

विशेष संकेतस्थळ उपलब्ध

सूचना कुठे पाठवाल? –  संकेतस्थळ :  menifesto@inc.in

व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक : ७७९२०८८२४५