बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) सर्वेसर्वा मायावती यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या १०४ जागांसाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. जर काँग्रेस पक्षाने आपल्या प्रचाराच्या भाषणांत जेडीएसला भाजपाची ‘बी टीम’ म्हटले नसते तर कदाचित निकाल वेगळे लागले असते. या निवडणुकीत भाजपाची संख्या १०४ राहिली नसती. त्यांना खूप कमी जागा मिळाल्या असल्या. काँग्रेसने छोटीशी चूक केली आणि त्याचा फायदा भाजपाला मिळाला, असे त्यांनी म्हटले.

भाजपा किंवा राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला फायदा होईल, अशा भाषेचा वापर भविष्यात कोणत्याही निवडणुकीतील प्रचारसभेत करू नये, असा सल्ला मी काँग्रेसला देऊ इच्छिते, असे मायावती यांनी म्हटले.

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने आपल्या भाषणात विशेषत: मुस्लीम बहुल भागात जेडीएसला भाजपाची ‘बी’ टीम म्हणत त्यांच्या मतात आणखी विभागणी केली. त्यामुळेच अशा भागात बहुतांश भाजपाचे उमेदवार यशस्वी झाले, असेही मायावती म्हणाल्या.

दरम्यान, या निवडणुकीत भाजपाला १०४, काँग्रेसला ७८, जेडीएसला ३७ आणि इतरांना २ जागा मिळाल्या आहेत. २२४ पैकी २२२ विधानसभा मतदारसंघासाठी मतदान झाले होते. त्यानंतर सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपाला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण राज्यपालांनी दिले होते. पण विश्वास ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आता कुमारस्वामी देवेगौडा हे मुख्यमंत्रीपदाची शपथ बुधवारी घेणार आहेत. त्यांना काँग्रेसने पाठिंबा दिला आहे.