संरक्षणमंत्री अँटनी यांची ग्वाही 
‘भारतातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीकडून झालेल्या हेलिकॉप्टर खरेदीत लाचखोरी सिद्ध झाल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही, या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट झाल्यास हे कंत्राटच रद्द करण्यात येईल,’ अशी ग्वाही बुधवारी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी घेतली. मात्र, हा घोटाळा दोन महिने आधीच लक्षात आणून दिल्यावरही त्याकडे संरक्षणमंत्री अँटनी यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
हेलिकॉप्टर सौद्यात इटालियन कंपनी फिनमेकानिकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जोसेफ ओर्सी यांनी ३६२ कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप असून, त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून इटलीत अटक करण्यात आली आहे. फिनमेकानिकाची उपकंपनी असलेल्या ऑगस्टा वेस्टलँडकडून ३६०० कोटी रुपयांची १२ हेलिकॉप्टर्स घेण्याचा करार संरक्षण खात्याने २०१० साली केला होता. या करारानुसार भारताला तीन हेलिकॉप्टर्स मिळाली असून, उर्वरित नऊ हेलिकॉप्टर्सचा ताबा घेण्याचा निर्णय संरक्षण खात्याने तूर्तास थांबविला आहे.
या प्रकरणाची चौकशी करण्याचे अँटनी यांनी सीबीआयला आदेश दिले असून, लवकरात लवकर प्राथमिक अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
सीबीआय अहवाल प्राप्त होताच दोषींवर कारवाई करण्यात येईल. त्यात हेलिकॉप्टर खरेदीचे कंत्राट रद्द करण्याच्या निर्णयाचाही समावेश असू शकतो, असे अँटनी यांनी सांगितले. या सौद्यात माजी हवाईदल प्रमुख एस. पी. त्यागी यांच्या भूमिकेविषयी विचारले असता त्याविषयी आपल्याला माहिती नसल्याचे अँटनी यांनी सांगितले.
कारवाई काय?
फिनमेकानिकाची उपकंपनी असलेल्या ऑगस्टा वेस्टलँडकडून ३६०० कोटी रुपयांची १२ हेलिकॉप्टर्स घेण्याचा करार संरक्षण खात्याने २०१० साली केला होता. या करारानुसार भारताला तीन हेलिकॉप्टर्स मिळाली असून, घोटाळा उघड झाल्यामुळे  उर्वरित नऊ हेलिकॉप्टर्सचा ताबा घेण्याचा निर्णय संरक्षण खात्याने तूर्तास थांबविला आहे. सरकारने इतर १९७ हेलिकॉप्टरची खरेदी देखील  लांबणीवर टाकली आहे.

जावडेकर यांचे पत्र
गेल्या वर्षी राज्यसभेत भाजपचे प्रवक्ते व खासदार प्रकाश जावडेकर यांनी हेलिकॉप्टर खरेदी व्यवहाराकडे घोटाळ्याकडे लक्ष वेधले होते. या प्रकरणी फिनमेकानिकाचे स्वित्झर्लंडस्थित सल्लागार गुईडो राल्फ हॅश्के याला भारताचा सौदा मार्गी लावण्यासाठी ३५० कोटी रुपये दिल्याच्या आरोपाची इटली आणि ब्रिटनमध्ये या लाचखोरीची चौकशी सुरु असतानाही केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप १४ डिसेंबर २०१२ रोजी जावडेकर यांनी अँटनी यांना पत्र लिहून केला होता. राज्यसभेत यावर अल्पकालीन चर्चा करण्यासाठी आपण नोटीस दिली होती, असे जावडेकर यांनी सांगितले. इटलीची आर्थिक स्थिती डबघाईला येऊनही तो देश भ्रष्टाचाराची चौकशी करीत आहे, पण भारतात मात्र या प्रकरणाची दखली घेतली जात नसल्याचा आरोप जावडेकर यांनी केला.

संरक्षण खरेदी पारदर्शी : चाको
 काँग्रेसचे प्रवक्ते पी. सी. चाको यांनी अँटनी यांचा बचाव केला.  अँटनी यांनी या प्रकरणाची सीबीआयकडे चौकशी सोपविली असून लवकरात लवकर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. हेलिकॉप्टर सौद्याची सुरुवात भाजपप्रणित रालोआच्या काळातच झाली होती, असा आरोप करून चाको म्हणाले की, विरोधक या मुद्यावरून अकारण संशयाचे धुके निर्माण करीत आहेत. संरक्षण खात्यात कुठलाही गैरप्रकार तात्काळ उघडकीस येईल, अशी प्रणाली प्रस्थापित करण्यात आली आहे.