देशभरातील पोलीस यंत्रणा गेल्या वर्षभरापासून करोनाकाळात रस्त्यावर लोकांना कोविडच्या नियमांच पालन करण्याचं आवाहन करत आहे. काही वेळा नागरिकांना कठोर शब्दात याचं महत्त्व पोलिसांना पटवून द्यावं लागत आहे. निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे.

काही वेळा परिस्थिती जाणून न घेता अतिरेक केल्याचा घटना घडल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये पोलिसांनी एका व्यक्तीवर निर्बंधादरम्यान बाहेर पडल्यामुळे कारवाई केली आहे. पत्नीसोबत आपल्या ४ महिन्याच्या मुलाला घेऊन दवाखान्यात गेलेल्या व्यक्तीवर कारवाई केली आहे. पोलिसांनी कारवाई करत त्याच्याकडून दंड वसूल केला आहे. पोलिसांच्या या कृतीमुळे सर्वत्र टीका केली जात आहे.

फिरोजाबाद येथील रहिवासी राजू कुशवाह हा मंगळवारी रात्री बाईकने आपल्या ४ महिन्यांच्या आजारी बाळाला घेऊन डॉक्टरकडे गेला होता. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी राधा देखील होती. तेथून परतत असताना पोलीस निरीक्षक वीरेंद्रसिंग धामा यांनी त्यांची दुचाकी थांबवली आणि ‘करोना कर्फ्यू’ चे उल्लंघन केल्याचे सांगत राजूवर एक हजार रुपयांचा दंड आकारला.

राजूने आपल्या मुलाची प्रकृती ठीक नाही आणि त्यामुळे डॉक्टरकडे घेऊन जात असल्याचे पोलीस निरीक्षकांना सांगितले. मात्र त्यांनी राजूची कोणतीही गोष्ट ऐकण्यास नकार दिला आणि दंड वसूल केला. त्यानंतर स्थानिकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. याघटनेची स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे. आवश्यकअसल्याच कारवाई करणार असल्याची ग्वाही पोलिस अधीक्षक मुकेशकुमार मिश्रा यांनी दिली आहे.