देशभरात गेल्या चोवीस तासांत करोनाच्या आणखी ४१ हजार ३८३ रुग्णांची नोंद झाली आहे, तर ५०७ जणांचा मृत्यू झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन उपचाराधीन रुग्णांची संख्या ४ लाख ९ हजार ३९४ इतकी झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केले.

देशभरात आतापर्यंत एकूण ३ कोटी १२ लाख ५७ हजार ७२० जणांना करोनाची लागण झाली असून ४ लाख १८ हजार ९८७ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांची संख्या १.३१ टक्के इतकी आहे.

करोनामुक्त होण्याची टक्केवारी ९७.३५ इतकी आहे. बुधवारी १७ लाख १८ हजार ४३९ चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत ४५ कोटी ९ लाख ११ हजार ७१२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ३ कोटी ४ लाख २९ हजार ३३९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर मृत्यूदर १.३४ टक्के नोंदवला गेला आहे.

राज्यांकडे ३.२० कोटी लसमात्रा शिल्लक

केंद्रशासित प्रदेश, राज्ये आणि खासगी रुग्णालयांमध्ये ३ कोटी २० लाख लसमात्रा शिल्लक आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले.  आतापर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ४३ कोटी ७९ लाख ७८ हजार ९०० लसमात्रा पुरवण्यात आल्या असून अजून ७ लाख मात्रा लवकरच देण्यात येणार आहेत. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत उपलब्ध साठ्यानुसार वाया गेलेल्या लसमात्रांसह आतापर्यंत एकूण ४० कोटी ५९ लाख ७७ हजार ४१० लसमात्रांचा वापर करण्यात आला आहे. तर ३ कोटी २० लाख १ हजार ४९० लसमात्रा शिल्लक आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. लसीकरणाची गती आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.