21 September 2020

News Flash

मोदी-अंबानी नाही, आम आदमीच्या सरकारची देशाला गरज: राहुल गांधी

काँग्रेस पक्ष २० हजार घोषणा करणार नाही, आम्हाला चार-पाचच गोष्टी करायच्या आहेत पण आम्ही त्या पूर्णत्त्वास नेऊ असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे

राहुल गांधी (संग्रहित छायाचित्र)

आपल्या देशाला नीरव मोदी आणि अनिल अंबानी सरकारची नाही तर आम आदमीच्या सरकारची गरज आहे असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर टीकेची तोफ डागली. मध्यप्रदेशातील रेवा या ठिकाणी राहुल गांधी यांची रॅली पार पडली त्यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान केले आहे.

काँग्रेस पक्ष २० हजार घोषणा करणार नाही, आम्हाला चार-पाचच गोष्टी करायच्या आहेत पण आम्ही त्या पूर्णत्त्वास नेऊ. जनतेचा आवाज ऐकून आम्हाला सरकार चालवायचे आहे. मध्यप्रदेशात काँग्रेसची सत्ता आली तर पहिले काम युवकांना रोजगार देणे असेल अशीही घोषणा राहुल गांधींनी केली. मोदी म्हणतात आम्ही सत्तेवर येण्याआधी भारत निद्रावस्थेत होता. या भारताला जाग आणण्याचे काम मी केले आहे. मात्र भारत विकासाच्या मार्गावर आहे कारण इथल्या शेतकऱ्यांनी, महिलांनी, मजुरांनी, छोट्या व्यापाऱ्यांनी हा भारत घडवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेऊन छोट्या व्यापाऱ्यांना संपवून टाकले, तुमचे पैसे नीरव मोदी, अनिल अंबानी, मेहुल चोक्सी यांना वाटले. विजय मल्ल्या यांना सांगून देश सोडून निघून गेला तरीही ते पाहात बसले. अंबानींना ३० हजार कोटी दिले, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदीला ३५ हजार कोटी दिले, विजय मल्ल्याला ९ हजार कोटी दिले हाच मोदींचा मेक इन इंडिया आहे असाही टोला राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात लगावला.

मी देशाचा चौकीदार आहे असं नरेंद्र मोदी सांगतात मग राफेल घोटाळा का केला याचे उत्तर देतील का? नाही देऊ शकणार कारण देशाचा पंतप्रधान चोर आहे चौकीदार नाही. भारतातच नाही तर फ्रान्समध्येही हाच डांगोरा पिटला जातो आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी चोर आहेत. लोकसभेत मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला की देशातील युवकांचा रोजगार तुम्ही का हिसकावून घेतलात? राफेल विमानांच्या निर्मितीची जबाबदारी भारतीय कंपनी एचएएल न सोपवता अनिल अंबानींच्या कंपनीला का दिली? मात्र याचं काहीही उत्तर त्यांच्याकडे नाही कारण देशाचा चौकीदार चोर आहे असाही पुनरुच्चार राहुल गांधी यांनी केला. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत आपल्या भाषणांमध्ये मोदी त्याचा साधा उल्लेखही करत नाहीत. असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 7:03 pm

Web Title: country need peoples government not modi and ambanis government says rahul gandhi in mp rally
Next Stories
1 मूर्खांसाठी काँग्रेस हेच एकमेव ठिकाण: अमित शाहांचा राहुल गांधीवर पलटवार
2 पॉर्न साईटस ब्लॉक न केल्यास इंटरनेट कंपन्यांचा परवाना रद्द – उच्च न्यायालय
3 मुंबई कोर्टाची अरविंद केजरीवालना क्लीन चीट
Just Now!
X