देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रोज हजारो रुग्णांची यात भर पडत आहे. पण दुसरीकडे आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत भारतात करोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात येण्याचा दावा करण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या तज्ज्ञांकडून हा दावा करण्यात आला आहे. या निष्कर्षावर पोहोचण्यासाठी त्यांनी गणिताच्या मॉडेलवर आधारित विश्लेषणाची मदत घेतली आहे.

जेव्हा गुणांक हा १०० टक्क्यांवर पोहोचेल तेव्हा करोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात येईल, असं विश्लेषणातून समोर आलं आहे. या संदर्भात करण्यात आलेले विश्लेषण ऑनलाइन जर्नल एपीडेमीयोलॉजी इंटरनॅशनल मध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालनालयात (सार्वजनिक आरोग्य) उपसंचालक डॉ. अनिल कुमार आणि डीजीएचएसच्या सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) रुपाली रॉय यांनी या संदर्भातील अभ्यास केला आहे.

गणिताच्या मॉडेलचा आधार

त्यांना या निष्कर्षावर पोहोचण्यासाठी बेलीच्या गणिताच्या मॉडेलचा वापर केला. हे गणिताचं मॉडेल कोणत्याही महामारीच्या संपूर्ण परिस्थितीचा विचार करते. यामध्ये संसर्ग, त्याची वाढ याचा समावेश करण्यात आला आहे. हे स्वरूप सतत सुरू असलेल्या संसर्गाचा प्रकार म्हणून वापरले जात होते. संसर्ग झालेली व्यक्ती तेव्हापर्यंत संर्सर्गाचा स्त्रोत बनून राहिलं जोवर तो या चक्रातून मुक्त होत नाही किंवा त्याचा मृत्यू होत नाही, असं या म्हटलं आहे.

भारतात २ मार्चपासून सुरूवात

करोनाच्या एकूण संसर्गाचा कालावधी आणि या आजारातून बाहेर येण्याचा कालावधी यांच्यातील संबंधाबाबतही विश्लेषण करण्यात आलं आहे. अहवालानुसार भारतात करोनाचा प्रसार २ मार्चपासून सुरू झाला आहे आणि त्यानंतरच करोनाचे रुग्ण वाढत गेल्याचं म्हटलं आहे.

याच्या विश्लेषणासाठी तज्ज्ञांनी वर्ल्डमीटर्स डॉट इन्फोवरून भारतातील करोनाग्रस्तांचे मार्च महिन्यापर्यंत नमूद करण्यात आलेले आकडे घेतले. यामध्ये रुग्णसंख्या, त्यातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आणि मृतांच्या संख्येचा समावेश होता. अभ्यासाठी दस्तऐवजांप्रमाणे बेलीज रिलेटिव रिमूवल रेट (बीएमआरआरआर), कोविड १९ चं संख्यात्मक विश्लेषण (लिनिअर) यावरून करण्यात आलेले विश्लेषण असं दर्शवत आहे की सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत लिनिअर लाईन ही १०० पर्यंत पोहोचणार आहे.