जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमारला कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने (CPI) आपल्या राष्ट्रीय परिषदेत जागा दिली आहे. १२५ जणांच्या राष्ट्रीय परिषदेत सदस्य म्हणून कन्हैया कुमारची निवड झाली आहे. विशेष म्हणजे शनिवारी (दि.२८) कन्हैया कुमारने सीपीआयवर टीका करताना ‘कन्फ्यूज पार्टी ऑफ इंडिया’ असं म्हटलं होतं. सुधाकर रेड्डी यांची सलग तिस-यांदा सर्वसंमतीने पक्षाचे महासचिव म्हणून निवड झाली आहे. दुसरीकडे, सी दिवाकरन, सत्यम मोकेरी, सीएन चंद्रन आणि कमला सदानंदन यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना मात्र राष्ट्रीय परिषदेत जागा मिळालेली नाही.

कॉंग्रेससोबत युती करण्याच्या चर्चेवरुन कन्हैया कुमारने, सीपीआय ‘कन्फ्यूज पार्टी ऑफ इंडिया’ बनली आहे, असं म्हटलं होतं. कॉंग्रेसला समर्थन देण्याऐवजी सीपीआयने स्वतःच्या पक्षाची ताकद वाढवावी. कॉंग्रेसनेच भविष्यात सीपीआयकडे पाठिंबा मागायला यायला हवा, असं कन्हैया म्हणाला होता.

कन्हैया कुमार आतापर्यंत सीपीआयची विद्यार्थी संघटना एआयएसएफच्या राष्ट्रीय परिषदेचा सदस्य होता. काही दिवसांपूर्वीच कन्हैयाने बिहारमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. जर बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल, कॉंग्रेस आणि डाव्या संघटनांनी महाआघाडी स्थापन केली तर मी निवडणूक लढवण्यास तयार आहे असं कन्हैया म्हणाला होता.