इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या कसोटी सामन्यावर सट्टा लावणाऱ्या एका बुकीला पंजाबमधील जालंधर पोलिसांनी अटक केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हा बुकी उच्चशिक्षीत असून त्याच्याकडे सिव्हील इंजिनीअरिंग आणि आर्किटेक्चर या विषयातला डिप्लोमा आहे. शनिवारी BSF कॉलनी परिसरात केलेल्या कारवाईत पोलिसांनी या बुकीला अटक केली असून त्याच्याजवळ १.२३ कोटी रुपये रोखरक्कम, एक लॅपटॉप आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सौरव वर्मा असं आरोपीचं नाव असून जप्त केलेला लॅपटॉप आणि मोबाईल सायबर सेलकडे तपासाकरता देण्यात आला आहे.

जालंधर पोलिसांना आपल्या खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सौरव वर्मा घरातून बेटींगचं रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत वर्माच्या घरावर धाड टाकली. Z Account या ऑनलाईन अ‍ॅपद्वारे सौरव बेटींगचं रॅकेट चालवत होता. छापेमारी दरम्यान मिळालेल्या सौरवच्या इंजिनीअरिंग आणि आर्किटेक्चर डिप्लोमा प्रमाणपत्राचीही चौकशी करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. Gambling Act अंतर्गत पोलिसांनी सौरवला अटक केली असून या रॅकेटमध्ये अजून किती बुकी सहभागी आहेत याचा तपास सुरु आहे.