वेश्याव्यवसायापेक्षा डान्सबार केव्हाही चांगले असं मत सामाजिक कार्यकर्त्या वर्षा काळे यांनी व्यक्त केलं आहे. राज्य सरकारनं डान्स बारसंदर्भात लागू केलेल्या अटींविरोधात काळे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं डान्स बार मालकांना दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे राज्यामध्ये पुन्हा डान्सबार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना वर्षा काळे यांनी सांगितले की, “डान्स बार हा खूप मोठ्या संख्येने महिलांसाठी रोजगाराचं साधन होता. सरकारनं लादलेल्या अटी इतक्या जाचक होत्या की त्यांच्यासह डान्स बार चालवणं अशक्य होतं. आणि डान्स बार बंद झाल्यामुळे अनेक बारबालांना रोजगारासाठी वेश्याव्यवसायाकडे वळावं लागलं. भारतामध्ये वेश्याव्यवसायाला संरक्षण नसून हा अत्यंत जोखमीचा व्यवसाय आहे. तसंच वेश्याव्यवसायापेक्षा महिलांना डान्स बारमध्ये अधिक सन्मानानं काम करता येईल असं माझं मत आहे.” सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे डान्स बार चालकांना तसंच डान्स बारमध्ये काम करणाऱ्या महिलांना दिलासा मिळाला आहे अशी भावना काळे यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र सरकारनं केलेल्या डान्स बार संदर्भातील जाचक नियमांमध्ये धार्मिक स्थळं व शैक्षणिक संस्थांपासून एक किलोमीटर अंतरावर बंदी असणं, बार बालांना टिप देण्यास बंदी असणं व अशा ठिकाणी मद्य देण्यास बंदी असणं या नियमांचा समावेश होता जे सुप्रीम कोर्टानं रद्द केले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या कडक नियमावलींमुळे डान्स बारना बंदी नाही परंतु ते चालवणं शक्य नाही अशी कोंडी निर्माण झाली होती, जी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं फुटली आहे आणि महाराष्ट्रात पुन्हा डान्स बार सुरू होतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.