मुस्लिम महिलांनी केस कापू नये, तसेच त्यांच्या भुवयाही कोरु (आय-ब्रो) नयेत असा एक फतवा ‘दारुल उलूम देवबंद’ने जारी केला आहे. मौलाना सादिक काजमी यांनी हा फतवा जारी करत या गोष्टी इस्लाममध्ये निषिद्ध असल्याचे म्हटले. दारुल उलूमने याआधीच हा फतवा जारी करायला हवा होता असेही काजमी यांनी म्हटले. सहारणपूर येथील एका मुस्लिम माणसाने त्याच्या पत्नीचे केस कापण्याबाबत सादिक काजमी यांच्याकडे सल्ला मागितला होता. ‘मुस्लिम धर्मात महिलांनी केस कापणे आणि भुवया कोरणे योग्य आहे का?’ असे त्याने विचारले होते. त्यानंतर काही दिवसातच हा फतवा जारी करण्यात आला आहे.

मुस्लिम धर्मातील महिलांनी  केस कापले किंवा भुवया कोरल्या तर ते इस्लामच्या विरोधातील वर्तन आहे असे मानले जाईल असा उल्लेख या फतव्यात करण्यात आला आहे. मुस्लिम धर्मात महिलांसाठी १० गोष्टी निषिद्ध मानल्या गेल्या आहेत, त्यामध्ये केस कापणे आणि भुवया कोरणे याचाही समावेश आहे या तर्काचाही आधार या फतव्यासाठी घेण्यात आला आहे. मुस्लिम महिलांचे केस लांबसडक असणे हा त्यांच्या सौंदर्याचा भाग आहे त्यामुळे ते कापू नयेत. नाईलाजच असेल तर केस कापण्याला इस्लामने संमती दिली आहे. मात्र हौस म्हणून केस कापणे आणि भुवया कोरणे निषिद्ध मानले गेले आहे असे या फतव्यात नमूद करण्यात आले आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातील बातमी दिली आहे.

‘दारुल उलूम देवबंद’साठी मुस्लिम समाजाच्या मनात एक विशेष स्थान आहे. मुस्लिम धर्मातील मौलिक विचार जगभरात पोहचवण्याचे काम  ही संस्था काम करते. या विचारधारेचा प्रभाव असलेल्या मुस्लिमांना ‘देवबंदी’ म्हटले जाते. दारुल उलुम देवबंदची स्थापना ३० मे १८६६ मध्ये हाजी अबिद हुसैन आणि मौलाना कासिम नानातौवी यांनी केली.

‘एएनआय’ने या संदर्भातील मौलाना सादिक काजमी यांचे ट्विट करताच नेटिझन्सनी ट्विटरवर या विरोधात टीका करण्यास सुरुवात केली. ‘ शहनाज हुसैन, जावेद हबीब यांचे सलून बंद पाडणार का?’, ‘१४०० वर्षांपूर्वीचे कायदे बदलायला तुम्ही तयार नाही मग जगासोबत कसे चालणार?’ ‘असल्या लोकांना जास्त महत्त्व देण्याची गरज नाही!’ अशा प्रतिक्रिया नोंदवत या फतव्याला विरोध करण्यात आला आहे.