दिल्लीमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था(एआयआयएमएस)च्या परिचारिका संघटनेने आपल्या अनेक मागण्यांसाठी अनिश्चित काळासाठी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. एकीकडे करोनाचे संकट असताना दुसरीकडे आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे प्रशासनासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली एम्सचे अध्यक्ष डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सर्व परिचारिकांना, करोना काळात काम बंद आंदोलन करू नका, कामावर परत या व महामारीशी लढा, असे आवाहन केले आहे. शिवाय, त्यांच्या मागण्यांवर निश्चित विचार केला जाईल, असे आश्वासन देखील देण्यात आले आहे.

दरम्यान, आजपासून हे काम बंद आंदोलन पुकारण्यात आलेले आहे. परिचारिका संघटनेच्या मागण्यांमध्ये सहाव्या केंद्रीय वेतन आयोगासंबंधीच्या मागणीचा देखील समावेश आहे. तसेच, परिचारिका संघटनेचे म्हणने आहे की बऱ्याच काळापासून त्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. या अगोदर बैठक घेऊन त्यांना सरकारकडून आश्वासन दिले गेले होते. मात्र, नंतर त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले गेले.

तर, एम्सचे अध्यक्ष रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे की, अशा संकट काळात परिचारिका संघटनेने काम बंद आंदोलन सुरू करण दुर्देवी आहे आणि हे तेव्हा होतंय जेव्हा अवघ्या काही महिन्यांमध्ये करोनावरील लस येणार आहे. मी सर्व परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो की, काम बंद आंदोलन करू नका, कामावर परत या आणि महामारीच्या संकटातून वाचण्यासाठी मदत करा.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार गुलेरिया यांनी म्हटले आहे की, परिचारिका संघटनेने मागण्या मांडल्या होत्या आणि एम्सकडून देखील सर्व अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले गेले आहे. या महामारीच्या काळात परिचारिका आपल्या कर्तव्य सोडून अशाप्रकारे नाही जाऊ शकत. आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत की, ठरलेल्या नियोजनानुसार काम सुरू करा.