दिल्लीतील अनेक रुग्णालये सलग दुसऱ्या दिवशी प्राणवायूच्या टंचाईमुळे रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी धडपड करत असतानाच, या शहराला होणारा प्राणवायूचा पुरवठा रोखत असल्याचा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी बुधवारी हरियाणा सरकारवर केला.

आपल्या प्रशासनातील कुणीही काहीही रोखून धरलेले नसल्याचे सांगून हरियाणा सरकारने या आरोपाचे जोरदार खंडन केले.

केंद्र सरकारने दिल्लीचा प्राणवायूचा कोटा ३७८ मेट्रिक टनांवरून ७०० मेट्रिक टनांपर्यंत वाढवावा अशी मागणी ‘आप’ सरकार करीत आलेले आहे, असे सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तथापि, राज्यांसाठीचा प्राणवायूचा कोटा ठरवून देणाऱ्या केंद्राने याबाबत काहीही पाऊल उचललेले नाही, असे ते म्हणाले.

‘वाढलेला वापर लक्षात घेऊन केंद्र सरकारने आमचा ऑक्सिजनचा कोटा ७०० टनांपर्यंत वाढवावा, अशी आम्ही पुन्हा मागणी करत आहोत. उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थानसह अनेक राज्यांतील रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये भरती आहेत’, असे सिसोदिया यांनी सांगितले. हरियाणा सरकारच्या एका अधिकाऱ्याने फरीदाबादमधील संयंत्रातून दिल्लीला होणारा पुरवठा रोखला असल्याचा दावा त्यांनी केला.