मुंबई-अहमदाबाद मार्गावरील पहिल्या बुलेट ट्रेनच्या घोषणेनंतर केंद्र सरकारने दिल्ली ते वाराणसी या मार्गावर दुसऱ्या बुलेट ट्रेनची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेला आणि हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले वाराणसी शहर या बुलेट ट्रेनच्या माध्यमातून दिल्लीला जोडण्यात येईल. रेल्वेने हे अंतर ७८२ किलोमीटर इतके आहे. बुलेट ट्रेनच्या माध्यमातून हा प्रवास पूर्ण करण्यासाठी दोन तास ४० मिनिटांचा अवधी लागणार आहे. अलिगढ, आग्रा, कानपूर, लखनऊ आणि सुलतानपूर मार्गे ही बुलेट ट्रेन वाराणसीला पोहोचेल.
पुढील वर्षाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रातील सत्ताधारी भाजपकडून उत्तर प्रदेशसाठी विविध निर्णयांची घोषणा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिल्ली-वाराणसी बुलेट ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई ते अहमदाबाद मार्गावरील बुलेट ट्रेनसाठी रेल्वे मंत्रालयाने जपानशी बोलणी केली असून, या प्रकल्पासाठी निधी उभारण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. बुलेट ट्रेनसाठी रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत हायस्पीड रेल कॉर्पोरेशनची स्थापनाही करण्यात आली आहे.