दिल्लीत एका उंच इमारतीची स्वच्छता करत असताना दहाव्या मजल्यावरुन खाली पडून दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. व्हिडीओकॉनच्या इमारतीची स्वच्छता करताना ही दुर्घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत २२ वर्षीय राजू शर्मा आणि २३ वर्षीय अश्तियाक खान यांचा मृत्यू झाला. दोघेही एका वायरवर बसले होते. ही वायर तुटल्याने दोघे दहाव्या मजल्यावरुन खाली पडले. रुग्णालयात उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.

‘राजू शर्मा आणि अश्तियाक खान व्हिडीओकॉन टॉवरची साफसफाई करत होते. दोघेही काचा पुसत होते. महत्त्वाचं म्हणजे दोघांनीही सुरक्षेची कोणतीच काळजी घेतली नव्हती. दोघांनीही हेल्मेट घातले नव्हते किंवा सेफ्टी बेल्टही लावले नव्हते. स्वच्छता सुरु असताना सुरक्षेचं कोणतंही साधन तिथे उपलब्ध नव्हतं’, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

‘अश्तियाक आणि राजू दोघांनाही जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं. दोघांनाही अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झालं होतं. पण नंतर उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला’, असंही पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. स्वच्छतेची जबाबदारी एमएस एंटरप्रायजेस कंपनीकडे देण्यात आली होती. दोघे तरुण कंपनीसाठी काम करत होते. दोघा तरुणांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे.