बलात्काराला विरोध करणाऱ्या २१ वर्षाच्या तरुणीला नराधम मित्रानेच चौथ्या मजल्यावरुन खाली ढकलून दिल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणी ही एका ख्यातनाम हॉटेलमध्ये शेफ म्हणून कामाला असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दिल्लीत राहणाऱ्या २१ वर्षाच्या तरुणीला शुक्रवारी संध्याकाळी अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे ती घरातच होती. पण तिच्या काही मित्रांनी तिला भेटण्याचा आग्रह केला आणि तिला घराखाली घ्यायला आले. चौघांनी एका मॉलमध्ये जाण्याचा बेतही आखला होता. चौघे जण एकाच दुचाकीवरुन निघाले होते. मात्र पंजाबी बागजवळ चौघांना पोलिसांनी अडवले आणि त्यांची दुचाकी जप्त केली. यानंतर सर्वांनी पुन्हा घरी जाण्याचा निर्णय घेतला.
पीडित तरुणी आणि दोन तिचे दोन मित्र रिक्षेने घरी परतत होते. बेगमपूर येथे पोहोचताच यातील एका मित्राने आईशी ओळख करुन देतो असे सांगत पीडित तरुणीला इमारतीमध्ये नेले. तर तिचा एक मित्र रिक्षेतच बसून होता. नराधमाने तरुणीला बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर नेले आणि तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने विरोध दर्शवत त्याला प्रतिकार केला. यानंतर नराधम मित्राने पीडित तरुणीला चौथ्या मजल्यावरुन खाली ढकलले. अर्धनग्न अवस्थेतील पीडित तरुणी इमारतीतून खाली पडल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. यानंतर रिक्षेत बसलेल्या तरुणानेही घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी पीडित तरुणीच्या नराधम मित्राला अटक केली आहे. पीडित तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटना घडली त्यावेळी नराधम हा मद्यधूंद अवस्थेत होता अशी माहिती पोलिसांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 14, 2017 10:34 am