विधानसभा निवडणुकीचे पडघम कर्नाटकात वाजू लागलेले असतानाच कन्नड लिहिता, वाचता आणि बोलता येणाऱ्यांनाच निवडणुकीचे तिकीट द्यावे अशी मागणी कन्नड विकास प्राधिकरणाचे प्रमुख ‘मुख्यमंत्री’ चंद्रू यांनी रेटली आहे.
कर्नाटकात मे महिन्यात विधानसभा निवडणूक आहे. त्यासाठी सर्व पक्षांची  मोर्चेबांधणी सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर चंद्रू यांनी ही मागणी केली आहे. कर्नाटकात गेल्या काही वर्षांपासून कन्नडकडे दुर्लक्ष झाले आहे. परप्रांतीयांना निवडणुकीत तिकिटे दिली जातात. यंदा मात्र तसे होता कामा नये. कन्नड लिहिता, वाचता आणि बोलता येणाऱ्यांनाच तिकिटे द्यावीत अशी मागणी सर्व पक्षांकडे आम्ही केली आहे. कर्नाटकात कन्नडची गळचेपी सहन केली जाणार नाही. ज्या मतदारसंघात कन्नडिगांना प्राधान्य दिले जाणार नाहीत तेथे कन्नडचा ऱ्हास होत आहे असे आम्ही समजू व तेथील कन्नडिगांना मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे.