News Flash

आकाशगंगा देवयानी दीर्घिकेपेक्षा हलकी

आपली आकाशगंगा आपण समजत होतो त्यापेक्षा वजनाने कमी असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे. नवीन संशोधनानुसार आपल्या आकाशगंगेचे अचूक मापन पहिल्यांदाच करण्यात आले आहे.

| August 2, 2014 02:41 am

आपली आकाशगंगा आपण समजत होतो त्यापेक्षा वजनाने कमी असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे. नवीन संशोधनानुसार आपल्या आकाशगंगेचे अचूक मापन पहिल्यांदाच करण्यात आले आहे. आपली आकाशगंगा ही आपल्या शेजारच्या देवयानी दीर्घिकेच्या निम्म्या वजनाची आहे. आकाशगंगा व देवयानी या दोन मोठय़ा दीर्घिका समजल्या जातात व त्यांना खगोलवैज्ञानिक लोकल ग्रुप असे म्हणतात.
वैज्ञानिकांच्या मते देवयानी दीर्घिकेचे वजन कृष्ण वस्तुमानाच्या स्वरूपात जादाचे असावे, कृष्ण वस्तुमान हा दीर्घिकांच्या बाहेरचा अदृश्य भाग असून त्यात हे वस्तुमान सामावलेले असावे. देवयानी दीर्घिकेत आपल्या आकाशगंगेच्या पेक्षा दुप्पट कृष्ण वस्तुमान असावे, त्यामुळे ती दुप्पट वजनदार आहे. संशोधकांच्या मते या नव्या माहितीमुळे दीर्घिकांचे बाहेरचे भाग कसे तयार झाले असावे यावर प्रकाश पडेल. आतापर्यंत वैज्ञानिकांना कुठली दीर्घिका मोठी किंवा वजन जास्त ते ठरवता येत नव्हते. यापूर्वीच्या अभ्यासात दीर्घिकांच्या आतल्या भागाचे वस्तुमान मोजण्यात यश आले होते.
 नव्या अभ्यासानुसार दीर्घिकांच्या बाहेर असलेल्या अदृश्य वस्तुमानाचे मापनही करण्यात आले आहे, त्यामुळे कुठल्याही दीर्घिकेचे एकूण वस्तुमान काढणे शक्य झाले आहे. वैज्ञानिकांच्या मते दीर्घिकांचे अदृश्य वस्तुमान हे ९० टक्के प्रमाणात असते.
 एडिंबर्ग विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार दीर्घिकांमधील अंतर व त्यांचा वेग यांच्या आधारे देवयानी व आकाशगंगा या दीर्घिकांचे वस्तुमान काढण्यात आले आहे. एडिंबर्ग स्कूल ऑफ फिजिक्स अँड अ‍ॅस्ट्रॉनॉमीचे  डॉ. जॉर्ज पेनारूबिया यांनी सांगितले की, आम्हाला देवयानी दीर्घिका ही आकाशगंगेपेक्षा वस्तुमानाने जास्त असल्याचा संशय आधीच होता तो खरा ठरला आहे. मंथली नोटिसेस ऑफ द रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी या संस्थेच्या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2014 2:41 am

Web Title: devyani galaxy
टॅग : Galaxy
Next Stories
1 जागतिक व्यापार संघटनेची चर्चा निष्फळ
2 मुझफ्फर अली यांना राजीव गांधी सद्भावना पुरस्कार
3 ‘मोदींना व्हिसा नाकारला तो आधीच्या सरकारने’
Just Now!
X