पंतप्रधान कार्यालयाची हरकत केंद्रीय माहिती आयोगाने फेटाळली

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्र्यांविरुद्ध असलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी जाहीर करण्याचा मार्ग केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) मोकळा केला आहे. नोकरशहा संजीव चतुर्वेदी यांनी माहितीचा अधिकार कायद्यानुसार केलेल्या अर्जावर पंतप्रधानांच्या कार्यालयाने घेतलेली हरकत अयोग्य असल्याचे सीआयसीने स्पष्ट केले.

भारतीय वनसेवेतील अधिकारी चतुर्वेदी यांनी २००७ मध्ये पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे अर्ज करून जून २०१४ ते आजमितीपर्यंत केंद्रीय मंत्र्यांविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींबाबतचा सविस्तर तपशील देण्याची मागणी केली होती.

या अर्जाला पंतप्रधानांच्या कार्यालयाने २०१७ मध्ये उत्तर दिले त्यामध्ये म्हटले आहे की, सदर माहिती सामान्य आणि अस्पष्ट आहे. ही माहिती नाकारताना पंतप्रधानांच्या कार्यालयाने सीआयसीच्या आधीच्या आदेशाचा हवाला दिला.

याविरुद्ध चतुर्वेदी यांनी सीआयसीकडे संपर्क साधला असता, पंतप्रधानांच्या कार्यालयाने बिनचूक उत्तर/माहिती दिली नसल्याचे, सीआयसीने सांगितले. पंतप्रधानांच्या कार्यालयातील केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्यांना याबाबत १५ दिवसांमध्ये माहिती उपलब्ध करून देण्याचे आदेश सीआयसीने दिले आहेत.