दिल्लीत पाच वर्षांच्या चिमुरडीवर अमानवी बलात्कार करण्यात आल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटलेली असतानाच काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे. अशा प्रकारच्या कृत्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शब्दांची नव्हे, तर ठोस कृतीची गरज असल्याचे सोनिया गांधी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. देशातील प्रत्येक नागरिक दक्ष राहिला तर भविष्यात असे घृणास्पद प्रकार घडणार नाहीत, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, सोनिया गांधी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत जाऊन पीडित मुलीची विचारपूस करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. डिसेंबर महिन्यात दिल्लीत बसमध्ये करण्यात आलेल्या सामूहिक बलात्कारानंतरही सोनिया गांधी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
डिसेंबर महिन्यात झालेल्या सामूहिक बलात्काराचे तीव्र पडसाद उमटले होते आणि जनता रस्त्यावर उतरली होती. त्याचप्रमाणे शनिवारीही जनता पाच वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराविरुद्ध रस्त्यावर उतरली असून, पोलिसांच्या असंवेदनक्षम वर्तणुकीच्या निषेधार्थ त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.