थायलंडच्या चिअँग राय प्रांतातील गुहेत अडकलेल्या १३ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. रविवारपासून या बचाव मोहीमेला सुरूवात झाली होती. संपूर्ण जागचं लक्ष या बचाव मोहिमेकडे लागून राहिलं होतं. २३ जून पासून थायलंडच्या वाईल्ड बोअर फुटबॉल संघाचे १२ खेळाडू आणि त्यांचा एका शिकाऊ प्रशिक्षक बेपत्ता होते. त्यानंतर नऊ दिवसांनी यांचा शोध घेण्यात यश आलं. या मुलांचा ठावठिकाणा लागल्यापासून तीन कंमाडो आणि एक डॉक्टर सतत १६ दिवसांहून अधिक काळ त्यांच्यासोबत होते. ऑस्ट्रेलियातले प्रसिद्ध डॉक्टर आणि केव्ह एक्सपर्ट रिचर्ड हॅरिस हे लहान मुलांची काळजी घेण्यासाठी त्यांच्यासोबत गुहेतच थांबले होते मात्र, दुर्दैवानं याच काळात त्याच्या वडिलांचंही निधन झालं.

या गुहेतून मुलांची सुटका केल्यानंतर शेवटी रिचर्ड हॅरिस आणि काही पाणबुडे बाहेर आले. मात्र रिचर्ड गुहेतून बाहेर येण्याच्या एक दिवस आधी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. रिचर्ड हे काही काळासाठी सुट्टीवर होते. मात्र ही मुलं गुहेत अडकल्याची बातमी समजताच ते मदतीसाठी धावून आले होते. जीवाचा धोका पत्करून ते गुहेत शिरले इतकंच नाही तर काही दिवस ते मुलांसोबत थांबले देखील होते. ही सर्व मुलं सुखरूप बाहेर आल्याचा आनंद रिचर्ड यांना असला तरी शेवटच्या दिवसांत वडिलांना भेटू न शकल्याचं दु:खही त्यांना झालं.

ही मुलं गुहेत अडकल्यानंतर जगभरातील विविध देशांतील पाणबुडे, तज्ज्ञ आणि गुहेविषयी सलोख ज्ञान असणाऱ्या व्यक्ती थायलंडमध्ये आल्या. जगभरातील जवळपास १ हजारांहून तज्ज्ञ या मोहिमेत सहभागी झाले होते. या मोहिमेत ऑक्सिजन सिलेंडर पोहोचवताना एका माझी थाय नौदलाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. मात्र आता ही मुलं सुखरूप बाहेर आल्यानं सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.