अमेरिकेतील मुस्लीम, हिंदू, शीख आणि इतर अल्पसंख्य घटकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करताना अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड यांनी ‘मूलतत्त्ववादी इस्लाम’ ही जगासमोरील गंभीर समस्या ओळखण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
सीएनएन टाऊन हॉलमध्ये आयोजित परिषदेत अमेरिकेतील मुस्लीम, शीख, ज्यू आणि इतर अल्पसंख्याक घटकांच्या हक्कांच्या संरक्षणाबाबत प्रश्न विचारण्यात आल्यावर ट्रम्प म्हणाले की, या घटकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही अनुकूल आहोत. मात्र, त्याच वेळी मूलतत्त्ववादी इस्लामकडून असलेला धोका वेळीच ओळखणे गरजेचे आहे.
विस्कॉन्सिन येथे २०१२ मध्ये गुरुद्वारा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शीखांचे प्राण वाचविणारे निवृत्त लष्करी अधिकारी ब्रायन मर्फी यांनी हा प्रश्न विचारला होता. पुरोगामी इस्लामबाबत चर्चा करणे गरजेचे आहे. चर्चा केल्याशिवाय या अडचणीवर मात करता येणे अशक्य असल्याचेही या वेळी ट्रम्प यांनी सांगितले. आयसिस या दहशतवादी संघटनेच्या विरोधात सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे. आयसिसचा लवकरात लवकर खात्मा करण्याची गरज असून त्याशिवाय आपल्याकडे कुठलाही अन्य पर्याय नसल्याचेही ट्रम्प म्हणाले.
जगभरात मूलतत्त्ववादी इस्लामचा धोका वाढला असल्यामुळे अमेरिकेतील नागरिकांनी अतिशय दक्ष राहण्याची गरज आहे. दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना कोणताही चेहरा नसतो. तसेच या दहशतवाद्यांची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. ही सर्वात मोठी समस्या आहे. मशिदीमध्ये जातानाही प्रत्येकाने सावधगिरी बाळगली पाहिजे, असे ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या अंतिम लढतीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नामनिर्देशित करण्यात येणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास तिन्ही उमेदवारांनी नकार दिला. डोनाल्ड ट्रम्प, टेड क्रूझ आणि जॉन कॅसिच यांनी दुसऱ्या कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचे म्हटले आहे. माझ्या कुटुंबीयांवर शाब्दिक हल्ला करणाऱ्यांना मी पाठिंबा देणार नाही, असे टेड क्रूझ यांनी स्पष्ट केले.