दंतेवाडा येथे विधानसभा निवडणुकीचे वार्तांकन करण्यास गेलेल्या दूरदर्शनच्या पथकावर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात कॅमेरामन आणि दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर दूरदर्शनचे पथक नक्षलग्रस्त क्षेत्रातील दंतेवाडा येथे गेले होते. दंतेवाडा येथील अरणपूर जंगलात हा हल्ला झाला.

नक्षलवादविरोधी अभियानाचे प्रमुख पी सुंदर राज यांनी हल्ल्याच्या वृत्तास दुजोरा दिला असून जवानांचे एक पथक घटनास्थळी पेट्रोलिंगला पाठवण्यात आल्याचे सांगितले.

मृतांमध्ये उपनिरीक्षक रुद्रप्रताप, सहायक कॉन्स्टेबल मंगलू आणि डीडी न्यूजचे कॅमेरामन अच्युतनंद (दिल्ली) यांचा समावेश असल्याचे सुंदरराज यांनी सांगितले.

हल्ल्यानंतर दंतेवाडा परिसरात अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. १११ सीआरपीएफ बटालियनचे जवान घटनास्थळी पाठवल्याचे सुदंररराज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

तीन दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात सीआरपीएफचे चार जवान शहीद झाले होते. हा स्फोट छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात झाला होता. या आयइडी स्फोटोत दोन जवानही जखमी झाले होते.

छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या ९० जागांसाठी दोन टप्प्यात म्हणजे १२ आणि २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. नक्षलग्रस्त असलेल्या दक्षिण छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.

नक्षलवाद्यांनी ग्रामस्थांना भाजपाला मतदान न करण्याचे आवाहन केले आहे. तशी पोस्टर्सही त्यांनी विविध ठिकाणी लावली आहेत. त्याचबरोबर जे मतदान करतील त्यांचे हात कापू अशी धमकीही त्यांनी दिल्याचे सांगण्यात येते. त्याचदरम्यान हा हल्ला झाल्याने निवडणूक शांततेत पार पाडण्याचे सुरक्षा दलांसमोर आव्हान आहे.