भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रो येत्या एक एप्रिल रोजी इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स सॅटेलाइट एमिसॅटचे प्रक्षेपण करणार आहे. डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी अत्याधुनिक एमिसॅट उपग्रहाची निर्मिती केली आहे. भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा उपग्रह अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. एमिसॅटमुळे शत्रूच्या रडारची, तिथे चालणाऱ्या संवादाची आणि प्रदेशाची माहिती मिळवणे शक्य होणार आहे.

युद्धकाळात हा उपग्रह महत्वपूर्ण ठरेल. सीमेवर तैनात केलेले सेन्सर्स, शत्रूच्या प्रदेशातील रडारच्या हालचाली, त्या प्रदेशाची माहिती आणि नेमकी तिथे किती कम्युनिकेशन उपकरणे सुरु आहेत याची इत्यंभूत माहिती मिळेल असे डीआरडीओचे माजी वैज्ञानिक रवी गुप्ता यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले.

४३६ किलो वजनाच्या या उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तानच्या हालचालींवर अत्यंत बारीक लक्ष ठेवता येणार आहे. सुरक्षा यंत्रणा ड्रोन, एअरोस्टॅट आणि फुग्यांच्या माध्यमातून शत्रूची शस्त्रास्त्रे आणि हालचालींवर लक्ष ठेवतात. पण त्याला एक मर्यादा आहे. ड्रोन विमाने काही तास उड्डाण करु शकतात. हेलियम गॅस असे पर्यंत फुगा उडू शकतो असे गुप्ता यांनी सांगितले.

इलेक्ट्रॉनिक सॅटेलाइटमुळे त्या भागात मोबाइल फोनसह अन्य किती संवाद उपकरणे सक्रीय आहेत ते सुरक्षा यंत्रणांना कळणार आहे. मागच्या महिन्यात भारताने पाकिस्तानातील बालकोटमध्ये एअर स्ट्राइक केला. त्यामध्ये टेक्निकल इंटेलिजन्सची भूमिका महत्वाची होती. जैश-ए-मोहम्मदच्या तळावर किती दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा पुरावा मागितला तेव्हा एनटीआरओने तिथे ३०० मोबाइल सुरु असल्याची माहिती दिली. टेक्निकल इंटेलिजन्समुळे ही माहिती देणे शक्य झाले.

इलेक्ट्रॉनिक सॅटेलाइट अत्यंत अत्याधुनिक असेल तर दोन युझर्समध्ये काय संवाद झाला त्याचा अर्थ सुद्धा समजून घेता येईल. मेसेज डिकोड करण्याची प्रक्रिया खूप कठिण असते. एमिसॅटच्या आधी इस्त्रोने २४ जानेवारीला डीआरडीओचा मायक्रोसॅट-आर उपग्रह प्रक्षेपित केला आहे. रात्रीच्यावेळी सुद्धा फोटो काढण्याची या उपग्रहाची क्षमता आहे. इस्त्रोच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या भारताचे ४७ उपग्रह कार्यरत आहेत. त्यातील सात ते आठ उपग्रह खास लष्करी उपयोगासाठी टेहळणीसाठी त्यांचा वापर सुरु आहे.