सुनामीत ४०० नागरिकांचा मृत्यू, हजारो जखमी

इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटाला शुक्रवारी एक तासाच्या अंतराने भूकंपाचे दोन शक्तिशाली धक्के बसल्यानंतर आलेल्या सुनामीत सुमारे ४०० नागरिकांचा मृत्यू झाल्याचा, तर हजारो जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

इंडोनेशियाच्या राष्ट्रीय आपत्कालीन यंत्रणेने सुनामीत ३८४ जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले आहे. सर्व मृत सुनामीचा तडाखा बसलेल्या पालू शहरातील आहेत. भूकंपाच्या धक्क्य़ांनी संपूर्ण इंडोनेशिया हादरला आहे. पालूमधील विमानतळ बंद ठेवण्यात आला आहे.

शक्तिशाली भूकंपाच्या दोन धक्क्य़ांमुळे पालू शहरातील अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. त्यानंतर सुनामीच्या लाटांनी होत्याचे नव्हते केले. अनेक इमारतींची आणि घरांची पडझड झाली. शुक्रवारी सायंकाळी समुद्रकिनाऱ्यावर एक महोत्सव होणार होता. त्याच्या तयारीसाठी जमलेले शेकडो जण बेपत्ता झाले आहेत. जखमींची संख्या वाढत असल्याने रुग्णालयांमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे. त्यामुळे काही जखमींवर रुग्णालयाबाहेरच उपचार करण्यात येत आहेत.

सुलावेसी बेटापासून समुद्रात ७८ कि.मी.वर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाची क्षमता रिश्टर स्केलवर ७.५ एवढी होती. समुद्रात दहा कि.मी. खोल बसलेल्या भूकंपाने ८० कि. मी. परिसराला सुनामीचा तडाखा बसला. भीतीने नागरिक रस्त्यावर सैरावैरा धावत सुटले. त्यात अनेकजण जखमी झाले. या भूकंपाची तीव्रता इतकी होती की केंद्रबिंदूपासून दक्षिणेकडे ९०० कि.मी.वरील मकासर शहरही हादरले. दरम्यान, मदतकार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आल्याचे इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी सांगितले.

पालूतील एका इमारतीच्या गच्चीवरून घेण्यात आलेल्या व्हिडीओ फुटेजमध्ये, सुनामी लाटांनी अनेक इमारती पत्त्यांप्रमाणे कोसळल्याचे आणि एक मोठी मशीद पाण्याखाली गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. किनाऱ्याजवळच्या भागांतील इमारतींना महाकाय लाटा धडका देत असल्याचे आपण पाहिले, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.