जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभ देशांच्या यादीत भारताच्या क्रमवारीत झालेल्या मोठया सुधारणेचे श्रेय घेतानाच आपल्या सरकारने चार वर्षांच्या कालावधीत देशात १८० डिग्रीचा बदल घडवून आणल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केला. २०१४ साली मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हा व्यवसाय सुलभ १९० देशांच्या यादीत भारत १४२ व्या स्थानावर होता. मागच्या महिन्यात ३१ ऑक्टोंबरला जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या व्यवसाय सुलभ देशांच्या यादीत भारताच्या क्रमवारीत तब्बल २३ स्थानांची सुधारणा होऊन भारत ७७ व्या स्थानी पोहोचला आहे.
दिल्लीमध्ये व्यवसाय सुलभतेसंबंधी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना मोदींनी अप्रत्यक्षपणे आधीच्या काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवर टीका केली. जगातील टॉप १०० देशांमध्ये भारतही स्थान मिळवू शकतो यावर विश्वास ठेवणे काँग्रेसला कठिण जातेय असे मोदी म्हणाले.
२०१४ पूर्वी धोरण लकवा आणि धोरणांमध्ये अस्थितरता होती. त्यांना भारत आज पहिल्या १०० देशांमध्ये पोहोचू शकतो यावर विश्वास ठेवणे कठिण जातेय. चारवर्षात देशात १८० डिग्रीचा बदल झालाय. १४२ वरुन ७७ व्या स्थानापर्यंत पोहोचणे हा एक विक्रम आहे असे मोदी म्हणाले.
व्यवसाय सुलभ देशांच्या यादीत पहिल्या ५० मध्ये पोहोचण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पहिल्या ५० मध्ये पोहोचण्यासाठी आपल्या सर्वांना मिळून एकत्र काम केले पाहिजे. पुढच्या काही दिवसात मी विविध खात्यांबरोबर आढावा बैठका घेणार आहे. त्याचा परिणाम तुम्हाला पुढच्यावर्षी दिसेल असे मोदी म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 19, 2018 11:28 pm