वेगाने पसरणाऱ्या ईबोला या विषाणूजन्य तापाने आफ्रिकेच्या पश्चिमेकडील राष्ट्रांमध्ये आतापर्यंत सुमारे १३५० जणांचा बळी घेतला आह़े  यापैकी सर्वाधिक ५७६ बळी लिबेरियामध्ये गेले आहेत, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी दिली़  या देशांमध्ये इंधन, अन्न आणि मूलभूत गोष्टींचा तुटवडा भासू लागल्याचेही संघटनेने म्हटले आह़े
लिबेरिया, सिएरा लिओन आणि गुएनिया या आफ्रिकी देशांमध्ये ईबोलाचा मोठय़ा प्रमाणात फैलाव झाल्यामुळे अनेक विमान आणि नौसेवांनी या देशांच्या राजधान्यांमध्ये सेवा थांबविल्या आहेत़  त्यामुळे या देशांना टंचाई जाणवत आह़े
अनेक प्रयत्न करूनही या विषाणूंना अटकाव करण्यात येथील शासन व्यवस्थेला यश आलेले नाही़  येथील सुमारे ५० हजार लोकांना ईबोलाची बाधा झाली आह़े  या फैलावाच्या निषेधार्थ जनतेने शासनविरोधी निदर्शने सुरू केली असून काही ठिकाणी पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली़

कर्नाटकात अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हे
समाज माध्यमांद्वारे ईबोलाच्या फैलावासंबंधी अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश कर्नाटकचे आरोग्यमंत्री यु़  टी़  खदेर यांनी दिले आहेत़  गेल्या महिन्यात कर्नाटक एनआयटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा ईबोलाने मृत्यू झाल्याची अफवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पसरविण्यात आली होती़  ही अफवा पसरविणाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करण्यासही खदेर यांनी दक्षिणा कन्नडाचे जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाकुमार यांना सांगितले आह़े