पीएनबीला १३ हजार ४०० कोटींचा चुना लावून देशाबाहेर पळालेल्या नीरव मोदीच्या मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरुच आहे. आजही ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने नीरव मोदीची ४४ कोटींची मालमत्ता गोठवली. ३० कोटी रुपयांचा बँक बॅलन्स, स्टीलची १७६ कपाटे, विदेशी घड्याळांनी भरलेली ६० प्लास्टिक खोकी, १३.८६ कोटी रुपयांचे शेअर्स गोठवले आहेत. ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

गेल्या आठवड्याभरापासून हिरे व्यापारी नीरव मोदीशी संबंधित विविध ठिकाणांवर आम्ही छापेमारी करतो आहोत. १५८ पेट्याही आम्ही ताब्यात घेतल्या आहेत. गुरुवारीच अंमलबजावणी संचलनालयाने नीरव मोदी आणि त्याच्या कंपनीच्या नऊ आलिशान कार जप्त केल्या होत्या. तसेच ७.८० कोटीचे म्युचअल फंडही गोठवले आहेत. जप्त करण्यात आलेल्या कार्स मध्ये रोल्स रॉयसचाही समावेश आहे. या कारची किंमत ६ कोटी रुपये आहे. तसेच रोल्स रॉईस घोस्ट, मर्सडिझ बेंझ जीएल ३५०, पोर्शे पनामेरा, टोयोटा फॉर्च्युनर, टोयटो इनोव्हा आणि ३ होंडा कार्सचा समावेश आहे.

नीरव मोदीसोबतच मेहुल चोक्सीच्या ग्रुपशी संबंधित ८६.७२ कोटींचे शेअर्स आणि म्युचअल फंड गोठवण्यात आले आहेत. सीबीआय आणि ईडी यांच्याकडून घोटाळा प्रकरणात छापेमारी आणि जप्तीची कारवाई सुरुच आहे. नीरव मोदीच्या फायर स्टार डायमंड या कंपनीच्या पाच अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली त्यांचीही चौकशी सुरु आहे.